सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्हा तालीम संघाच्या वतीने 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी व उपमहाराष्ट्र केसरीसह वजनी गटातील विजेत्या मल्लांना 70 पैलवानांना एकूण 9 लाखांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
जिल्हा तालीम संघाचे प्रमुख मार्गदर्शक साहेबराव पवार यांनी त्यांच्या वैयक्तिक मिळकतीमधून तब्बल 9 लाख रुपयांचे बक्षीस या मल्लांना देण्याचे जाहीर केले. पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, सुधीर पवार, तालीम संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला 1 लाख 20 हजार तर उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकरला 70 हजार रुपये जाहीर करण्यात आले. माती गटातील 30 आणि गादी गटातील 40 अशा एकूण 70 विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाला 20 हजार, द्वितीय क्रमांकाला 10 हजार आणि तृतीय क्रमांकाला 5 हजारांचे दिले जाणार आहे.