Monday, February 6, 2023

सातारा एलसीबीची कारवाई : सराईत दुचाकीचोर टोळी जेरबंद, 13 दुचाकीसह 1 एटीएम फोडीचा गुन्हा उघड

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड परिसरात धुमाकुळ घालणार्‍या तीनजणांच्या सराईत दुचाकी टोळीला सातारा एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या टोळीने दुचाकी चोरीच्या 13 गुन्ह्यांचा व शेणोली स्टेशन येथील एटीएम चोरीचा 1 अशा 14 गुन्ह्यांचा छडा लागला आहे. महादेव बाळासाो कोळी (वय 30, रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा), किशोर कृष्णा गुजर (वय 24 रा. कोडोली, ता. कराड) व रोहित आनंदा देसाई (वय 23, रा. तांबवे, ता. कराड) अशी आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, मागील काही दिवसांपासून कराड शहर आणि कराड तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने कराड परिसरात खबर्‍यांकडून माहिती घेतली असता. किल्ले मच्छिंद्रगड, कोडोली व तांबवे येथील तिघा संशयीतांनी कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली दुचाकी व कराड परिसरातून अनेक मोटार सायकली चोरल्याची माहिती मिळाली.

या माहितीवरून पथकाने कराड परिसरामध्ये संशयित इसमांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी टेंभू (ता. कराड) येथून दि. 29 रोजी 1 हिरो होंडा सी.डी. 100 एस.एस. मोटार सायकल चोरी केल्याची प्राथमिक माहिती सांगितले. म्हणून त्यांना कराड तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात अटक करुन त्यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कराड यांचे न्यायालयातून 2 दिवसांची पोलीस कोठडी घेतली. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून 7, कराड शहर पोलीस स्टेशन हद्दीतून 3, तळबीड पोलीस स्टेशन हद्दीतील 1, पलूस पोलीस स्टेशन जि. सांगली हद्दीतून 1 तसेच कुरळप पोलीस स्टेशन जि. सांगली हद्दीतून 1 अशा सातारा व सांगली जिल्हयातून एकुण 13 मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले.

तसेच दि. 27 मे 2021 रोजी रात्री कराड तालुक्यातील शेणोली येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे ए. टी. एम. मशिन फोडले असल्याचे सांगितले आहे. कराड तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल मोटर सायकल चोरीच्या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. रमेश गर्जे करत असून आरोपींकडुन आतापर्यंत वेगवेगळया कंपनीच्या एकुण 13 मोटार सायकल व शेणोली स्टेशन येथील ए.टी.एम.मशिन फोडण्याकरीता वापलेली हत्यारे असा एकुण 2 लाख 25 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने, पो.हवा.कांतीलाल नवघणे, संतोष पवार, पो.ना.शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, अमित सपकाळ, रवी वाघमारे, पो.कॉ.विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन, विजय सावंत, गणेश कचरे, संगणक विभागातील प्रविण अहिरे यांनी केली आहे.