सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ फेब्रुवारीला सातारा जिल्ह्यात दारूविक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्रक जारी करत आदेश जाहीर केला आहे. तसेच जर कोणी या आदेशाचे पालन केलं नाही तर त्याच्यावर कडक कारवी करण्यात येईल असेही सदर आदेशात म्हंटल आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नेमका काय?
सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142 ( 1 ) मधील तरतुदीनुसार आदेश देण्यात येतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दिनांक 14 एप्रिल, 2023 रोजी सातारा जिल्हयातील सर्व देशी दारू किरकोळ विक्री (सीएल-3), बिअर विक्री परवाने (एफएल / बीआर-2) विदेशी मद्यविक्री (एफएल-2) परवाना (एफएल-3) बिअरबार (फॉर्म ई) व ताडी दुकान टिडी-1 या अनुज्ञप्तीची जागा व विकी पुर्णपणे बंद ठेवण्याच्या आहेत.
तसेच सदर आदेशाचे कोणत्याही अनुज्ञप्तीधारकाने उल्लंघन केल्यास त्यांच्या विरूध्द मुंबई मद्य निषेध कायदा 1949 व त्याअंतर्गत असलेल्या नियमान्वये योग्य ती कडक कारवाई केली जाईल. तसेच अनुज्ञप्ती बंदच्या कालावधीची नुकसान भरपाई दिली जाणार नाही असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सुशिक्षित बेरोजगार संघटनेने केली होती मागणी –
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल हा दिवस मद्यपान बंदी दिवस म्हणून घोषित करावा अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्याबाबतचे निवेदन सुद्धा त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे दिले होते.