सातारा- मेढा रस्त्यावर होळी सणासाठी जाताना युवकाचा अपघातात मृत्यू

सातारा | सातारा- मेढा रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला. गुरूवारी रात्री गावाकडे होळी सणासाठी गावाकडे जात असताना केंजळ गावच्या हद्दीत हा अपघात झाला. शैलेश बाळाराम गोगावले (वय- 23, रा. गोगावलेवाडी) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोगावलेवाडी (ता. सातारा) येथील शैलेश गोगावले हा गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मेढयाहून आपल्या गावाकडे होळीसाठी येत होता. यावेळी सातारा- मेढा रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून येत त्‍याच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील युवक हा दुचाकीसह ट्रॉलीच्या उसात जाउन अडकला. या भीषण अपघातात दुचाकीस्‍वार शैलेश हा जागीच ठार झाला. रात्री उशीर झाला तरी शैलेश घरी आला नसल्‍याने कुटुंबियांनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता, त्यांना अपघाताची माहिती कळाली.

अपघाताची माहिती मिळताच कुटुंबियांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. एकलुता एक मुलगा अपघातात ठार झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.