Wednesday, October 5, 2022

Buy now

भाडेपट्टा शर्तभंग करणाऱ्या “नमस्ते पुरोहीत”चा करार रद्द करण्याची मागणी; पाचगणी नगरपालिकेसमोर घंटानाद आंदोलन

सातारा । नगरपालिकेने वेळोवेळी हॉटेल “नमस्ते पुरोहित “च्या मालकाला भाडेपट्टा वाणिज्य संकुलात गाळ्याच्या वाढीव आणि बेकायदेशीर बांधकामाबाबत तक्रारी देऊनसुद्धा शर्तभंग करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. “नमस्ते पुरोहीत”चा भाडेपट्टा करार रद्द करावा या मागणीकडे पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे नगरपालिकेच्या भाडेपट्टा मालमत्तेत भाडेपट्टा गाळ्यात अनधिकृत बांधकामाला पाठीशी घातलं जाण्याचा आरोप होत आहे. यामध्ये मोठी आर्थिक अपहार झाल्याचाही संशय व्यक्त केला जात असून याविरोधात आवाज उठवण्यासाठी 24 सप्टेंबर रोजी पाचगणी नगरपरिषदेच्या गेटसमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे यांनी दिला आहे.

पाचगणी या इंग्रजांनी शोधलेल्या शहरांमध्ये बहुतांश मालमत्ता या भाडेपट्ट्यावर आहेत. पाचगणी नगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या या शॉपिंग सेंटरमध्ये “पुरोहीत नमस्ते” या भाडेपट्टा गाळ्याच्या भाडेपट्टा धारकाने अनधिकृतपणे किचन व गाळ्याच्या आतील बाजूस डागडुजीची परवनागी न घेता अंतर्गत बांधकाम केले आहे. एकूण काय, तर शॉपिंग सेंटरच्या भाडेपट्टा मालमत्तेत भाडेधारक “पुरोहीत नमस्ते”च्या मालकांनी शर्तभंग केला आहे.

पाचगणीतील नगरपालिकेच्या हद्दीमध्ये फायनल प्लाॅट नंबर १८० व १८२ या भाडेपट्टा भुखंडावर पाचगणी नगरपालिकेने सन १९८८ ला वाणिज्य संकुल मजुर करुन घेतले आहे. या वाणिज्य संकुलातील दुकान गाळ्याची लांबी आणि रुंदी ठरवून देण्यात आली आहे. नगररचना विभाग पुणे व सातारा यांनी परवानगी देताना गाळ्यामध्ये कोणताही बदल करु नये अशी सूचना दिली आहे. शिवाय भाडेपट्टा मालमत्तेत बदल न करण्याची अटही घातली आहे. असं असतानाही पाचगणीत भाडेपट्टा वाणिज्य संकुलातील धारकच मालक झाले आहेत. या भाडेकरूंवर प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने राजकीय दबाव वापरत आणि नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरत पाचगणीतील भाडेपट्टा शाॅपिंग सेंटरमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. शॉपिंग सेंटर हे नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असल्यानेच हा कारभार सुरु असल्याचं बोललं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.