धन्यवाद ! सातारा पोलिसांकडून तब्बल 1 कोटी 45 लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहर पोलिसांनी वेगवेगळ्या सात गुन्ह्यांमधील तब्बल 1 कोटी 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तो मुद्देमाल संबंधित फिर्यादिना परत देण्यात आला आहे. शहराची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने शहर पोलिसांच्या या सतर्क कामगिरीचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पत्रकार परिषदेत कौतुक केले.

यावेळी पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल म्हणाले, सातारा शहर पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांवर जबर बसवण्याच्या दृष्टिकोनातून नाईट पेट्रोलिंग आणि बेस्ट पोलिसिंग सत्र गतिमान केले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये घडलेल्या लुटमारीच्या घटनांमध्ये गुन्हेगारांनी जो मुद्देमाल पळवला, तो हस्तगत करण्याच्या दृष्टीने शहर पोलिसांनी विशेष कामगिरी केली. यामध्ये वनराज शिवाजी कुमकर हे दि. 20 ऑक्टोबर 2021 रोजी सिव्हिल हॉस्पिटल रोडने जात होते. त्यावेळी आरोपी संजय एकनाथ माने याने कुमकर यांना धारदार चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाइल आणि दोन पेन ड्राईव्ह असा मुद्देमाल लांबवला होता.

महानंदा प्रदीप कांबळे (रा. गुरुवार पेठ) व सीमा संजय कोकरे (रा. केसरकर पेठ) या दोन मैत्रिणी दर्शनासाठी देवळात गेलेल्या असताना आरोपीने 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घरातील कपाटातून चोरले होते. यामध्ये 22 ग्रॅमचे गंठण तर 23 ग्रॅमचा राणी हार लांबविला होता. क्षेत्रमाहुली येथील दिलीप विठ्ठल भिसे यांच्याकडील सेंट्रींग प्लेटा आरोपी संजय सूर्यवंशी याने भाड्याने घेऊन परस्पर 1 लाख 20 हजार रुपये किमतीला विकून टाकल्या. वरील दोन्ही घटनांमधील 3 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

गोडोली येथील आकाश राजेंद्र यादव यांच्या फ्रेंडस बेकरी येथून महेश हनुमंत गावडे गोडोली जय श्री बाबर, महेश तडाखे यांनी या दुकानाच्या ड्रॉवरमधील अर्धा तोळ्याची वेढणेच्या दोन अंगठी, एक तोळ्याची एक अंगठी असा 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. दुसऱ्या एका प्रकरणांमध्ये आरोपी शेळके आणि सय्यद यांनी फिर्यादीचे ट्रक नोटरी करून पुढील हप्ते भरतो असे म्हणून 40 ट्रक नेले होते. त्या ट्रकची परस्पर विक्री करण्यात आली यापैकी 9 ट्रक पोलिसांनी जप्त केले. त्याची किंमत 1 कोटी 40 लाख रुपये आहे ते ट्रक न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीला परत करण्यात आले आहेत.

तानाजी दत्तात्रय ससाने यांची हिरो होंडा कंपनीची फॅशन प्रो ही मोटरसायकल अज्ञात इसमाने लबाडीने चोरून नेली होती. ती पोलिसांनी हस्तगत करून न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीला परत केली आहे. या कामगिरीचा तपास पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या आदेशानुसार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस हवालदार नंदा अनभुले, हवालदार विकास शिंदे यांनी केला आहे.