सातारा डीबीची कारवाई : वाॅचमनला मारहाण करून ट्रक चोरणाऱ्या तिघांना अटक

सातारा | सातारा जवळील खिंडवाडी येथे वाॅचमनला मारहाण करून ट्रक चोरणाऱ्या तिघांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) अटक केली आहे. संशयितांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणातील वाहन जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ट्रक चोरीप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खिंडवाडी येथून श्रीराम एंटरप्रायझेसच्या पार्किंग मधून तिघांनी वॉचमनला मारहाण करुन ट्रक चोरून नेला होता. पार्किंगमधून ट्रक क्रमांक (एमएच- 09 ईएम- 2533) नेला होता. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासामध्ये संशयित केतन ओमप्रकाश गुप्ता (वय-25), ओमप्रकाश भालचंद्र गुप्ता (वय- 47) व रामानंद केराप्पा रोकडे (वय- 43 सर्व. रा.इचलकरंजी, जि. कोल्हापूर) येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार शहर डीबीच्या पथकाने ट्रक जप्त करून संशयित तिघांना अटक केली. सपोनि एस. के. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत बधे, पोलिस हवालदार अविनाश चव्हाण, जोतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, विनायक मानवी यांनी कारवाई केली.