सातारा एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन तर ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची लुबाडणूक

सातारा | एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आजपासून साताऱ्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे या आंदोलनामुळे ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांना तिकिट दर दुप्पट आकारून लुबाडले जात आहे.

सातारा जिल्ह्यातील 11 डेपोतील 4 हजार 200 कर्मचारी संपावर गेले आहेत. या आंदोलनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. पुणे- मुंबईला जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स चालक दुप्पट दर आकारून प्रवाशांची लूट करत आहेत. कालपर्यंत सातारा डेपो तील कर्मचारी हे संपात सहभागी झाले नव्हते, मात्र मध्यरात्री पासून सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. अचानक एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे सातारा बस डोपोत आलेल्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

दिवाळी सणाची सुट्टी संपल्याने नोकरदार वर्ग आता गावावरून परत परतू लागला आहे. अशातच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाचे मोठे हाल होवू लागले आहेत. त्यातच ट्रॅव्हल्स चालकांकडून मोठ्या प्रमाणावर तिकीटाच्या माध्यमातून अर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे या मनमानी तिकीट दर आकारणी करणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांवर कोण अंकुश ठेवणार असा सवाल प्रवाशांच्यातून केला जात आहे. साताऱ्यातून पुणे 500 तर मुंबईसाठी 1 हजार तिकिट दर आकारला जात आहे.

You might also like