हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेहिशोबी मालमत्ता आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंद्र जैन पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. तिहार तुरुंगात जैन यांचा चक्क मसाज करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे हे जेल आहे की मसाज पार्लर असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तिहार तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्येंद्र जैन बेडवर पडलेले आणि काही कागदपत्रे बघताना दिसत आहेत. या दरम्यान एक व्यक्ती पायाची मालिश करत आहे. सत्येंद्र जैन आपले पाय वर करून मालिश करून घेत असल्याचे दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने केजरीवाल सरकारवर हल्लाबोल केला आहे. आप सरकारने तुरुंगाच्या नियमांचे उल्लंघन केले आणि शिक्षेऐवजी सत्येंद्र जैन यांना पूर्ण व्हीव्हीआयपी मजा दिली जात आहे अशी टीका त्यांनी केली.
#WATCH | CCTV video emerges of jailed Delhi minister Satyendar Jain getting a massage inside Tihar jail. pic.twitter.com/VMi8175Gag
— ANI (@ANI) November 19, 2022
भाजपच्या आरोपानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी लगेच सत्येंद्र जैन यांची पाठराखण करत व्हायरल विडिओ बाबत स्पष्टीकरण दिले आहे . जैन यांची तब्येत खराब असून डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तिहारचे व्हिडिओ लीक होऊन भाजपपर्यंत कसे पोहोचले, असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर भाजपने जैन यांच्या आजाराची अशा प्रकारे खिल्ली उडवणे लाजिरवाणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.