हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात शाळेच्या खाजगीकरणाचा मुद्दा पेटला असताना सरकारकडून आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ‘एक राज्य, एक गणवेश’ अंमलबजावणी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेतंर्गत आणि समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक समान एक रंगाच्या गणवेशांचा लाभ घेता येणार आहे.
राज्य सरकारकडून ही अंमलबजावणी समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत आणि शासनाच्या मोफत गणवेश योजनेतंर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. नुकताच यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. सध्या, या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर “मोफत गणवेश योजने संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारे कार्यवाही करू नये” अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मुख्य म्हणजे, ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना एक रंग, एक दर्जा असलेला सारखाच गणवेश मिळणार आहे.
नविन गणवेश कसा असेल?
पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ‘एक राज्य, एक गणवेश’ या मोहिमेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश मिळणार आहे. मुलांसाठी हा गणवेश, आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट असा असणार आहे. तसेच, मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असा असणार आहे. ज्या शाळेत मुलींना सलवार कमीज असा गणवेश असेल त्यांना सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची अशा स्वरूपाचा गणवेश दिला जाईल. या सर्व गणवेशांच्या शिलाईचे काम स्थानिक महिला बचत गटाकडे देण्यात येणार आहे.