कोणतीही जीवितहानी नाही, पालकांकडून प्रशासनावर ताशेरे
गोंदीया प्रतिनिधी
देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीची स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने विद्यार्थ्यांना काही झाले नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डवकी येथे जि. प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा असून या शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. मात्र याच जीर्ण वर्गखोल्यांमध्ये धोका पत्करुन विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहे. मागील काही दिवसांपासून स्लॅबचे पोपडे पडत असून मंगळवारी स्लॅबचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने यात विद्यार्थी आणि शिक्षकांना कुठलीच हाणी झाली नाही.
मात्र ज्या ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळला त्या ठिकाणी कुणीच बसले नव्हते अन्यथा मोठी घटना घडली असती. दरम्यान याप्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान मुख्याध्यपकांनी याची माहिती पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. विशेष म्हणजे शाळेची इमारत जीर्ण झाली असून शाळेच्या इमारतीची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे धोका पत्करुन विद्यार्थ्यांना जीर्ण वर्गखोल्यांमध्ये धडे दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या जवळपास १३०० वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून त्यांची त्वरीत दुरूस्ती करण्याची गरज आहे.
सुदैवाने मंगळवारी झालेल्या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला इजा झाली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवाल सुध्दा पालकांकडून केला जात आहे. शाळेच्या इमारतीची दुरूस्ती त्वरीत करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाष्कर चौधरी, सरपंच उमराव बावणकर यांनी केली आहे. या शाळेच्या स्लॅबचे बांधकाम १० ते १२ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र अल्पावधीत स्लॅबचे पोपडे पडण्यास सुरूवात झाली असून सलाखी बाहेर दिसत आहे. तर स्लॅबचा काही भाग सुध्दा हळूहळू कोसळत आहे. त्यामुळे या बांधकामात वापरण्यात आलेल्या साहित्यावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
दरम्यान डवकी येथील जिह्वा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीचे स्लॅब कोसळल्याची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकांनी देवरी पंचायत समिती व केंद्रप्रमुखांना दिली. त्यानंतर केंद्रप्रमुख ई.एन.येळणे व एम.के.गेडाम यांनी शाळेला भेट देवून पाहणी केली.