धक्कादायक ! लातूरमध्ये भरदिवसा महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यातील विशाल नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. आज दुपारी बाराच्या सुमारास लातूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि रहदारीचा भाग असलेल्या विशाल नगर परिसरामध्ये काही अज्ञात तरुणांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भरदिवसा विद्यार्थ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी जखमी तरुणाला उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव राहुल सुरेश उजळंबे असे आहे. या तरुणावर कोणी आणि कोणत्या कारणावरून हल्ला केला हे अजून समजू शकले नाही. यानंतर पोलिसांनी अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. विशाल नगर परिसरातील साई मंदिरा शेजारील चौकात हा हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे.