Saturday, February 4, 2023

तांबवे येथील जेष्ठ नेते पी. डी. पाटील (दाजी) यांचे वृध्दपकाळाने निधन

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील तांबवे गावचे माजी सरपंच, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, जेष्ठ नेते पांडुरंग ज्ञानदेव पाटील उर्फ पी. डी. पाटील (वय- 80) यांचे वृध्दापकाळाने आज (शनिवारी) पहाटे निधन झाले. कराड तालुक्यात ते दाजी या नावाने परिचित होत.

- Advertisement -

जनमानसात रमणारे नेतृत्व म्हणुन त्यांची ओळख होती. कराड तालुक्याच्या राजकीय पटलावर त्यांनी आपले स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. 1992 साली ते कराड पंचायत समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवडून गेलेले होते. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, पी.डी.पाटील, विलासराव पाटील- उंडाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत त्यांनी काम केले होते.

तांबवे गावामध्ये 1999 साली जेष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना तांबवे गावात माजी मंत्री उंडाळकरांच्या पुढाकाराने धर्मांध, जातीयवादी शक्तीविरोधी परिषद झाली होती. त्याच्या नियोजनात ते अग्रभागी होते. त्यांचां दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्या निधनाने तांबवे गावातील अनेक एेतिहासीक घटनांचा साक्षीदार हरपला आहे. तांबवे गावचे विद्यमान उपसरपंच ऍड. विजयसिंह पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मूलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.