नाली गेली चोरीला! सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले होते भूमिपूजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी । शहरात एक अजब घटनेबाबतची तक्रार नोंदविण्यात आली आहे. ही तक्रार ऐकल्यास कोणीही चक्रावून जाईल. चंद्रपूरचे मावळते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या शहरातील विकासकामाच्या फलकावर नाली बांधकामाची नोंद आहे. मात्र, प्रत्येक्षात असं कुठलंही काम पूर्ण न झाल्यानं वसाहतीतील सुनील तिवारी यांनी आता थेट नाली चोरीची तक्रार पोलिसात दिली आहे. ही तक्रार शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चंद्रपुरातील नगिनाबाग प्रभाग १३ मध्ये विशेष अनुदान कार्यक्रमांतर्गत विविध विकासकामांसाठी साडे बारा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाचे चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते  भूमिपूजन करण्यात आले होते. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने कविश्वर नांदे या कंत्राटदारामार्फत सदर काम करण्यात आले आहे. ही संपूर्ण माहिती विकासकामांच्या फलकावर नोंदवली गेली आहे.

मात्र, या कामाच्या ठिकाणी लावलेल्या एका फलकाने वसाहतीतील नागरिकांना बुचकाळ्यात टाकले आहे. या फलकावर दिशाभूल करणारी तारीख तर नोंदविली आहेच शिवाय सिमेंट कॉंक्रिट, पेवर्स बसविण्यासोबतच नाली बांधकामाचाही उल्लेख आहे. त्यानुसार परिसरातील नागरिकांनी नालीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु शोधूनही अशी कुठली नाली सापडली नाही. तसेच या विकासकामांच्या फलकावर लिहिलेली तारीखही दिशाभूल करणारी आहे. ५ डिसेंबर २०१९ रोजी काम सुरू झाले आणि १६ सप्टेंबर २०१९ रोजी काम पूर्ण झाले असे फलकावर दाखविण्यात आले आहे. तेव्हा हे कसं शक्य असाही प्रश्न आता स्थानिकांना पडला आहे.

दरम्यान, येथे राहणारे सुनील तिवारी यांनाही फलकावर नमूद असलेली नाली सिमेंट कॉक्रिट रस्त्याच्या बाजूला दिसली नाही. तेव्हा त्यांनी थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून नवनिर्मित नाली चोरीला गेल्याची तक्रार दिली. तिवारी यांच्या नाली चोरीच्या तक्रारीने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, रामनगर पोलीस या तक्रारीवर काय कारवाई करतात याकडे तक्रारकर्ता आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment