स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. दरम्यान आता शिवसेनेला गळतीचे जणू ग्रहणच लागले आहे. यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. “स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही.”, असे ट्वीट शालिनी ठाकरे यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर मनसे नेते तसेच राज ठाकरे यांच्याकडून निशाणा साधला जात होता. मात्र, राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत शिंदे प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, शालिनी ठाकरे यांनी सेनेच्या परिस्थितीवर बोट ठेवत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ बोटावर मोजण्या इतकेच आमदार उरले आहेत. अशा परिस्थितीतही राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे.