हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्या म्हणजे २८ मे ला उदघाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उदघाटन होणार असून देशभरातील भाजप विरोधी पक्षांनी या उदघाटनावर बहिष्कार टाकला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बहिष्कारावरील नेमकं कारण सांगितलं आहे. मोदी सरकारने नवे संसद भवन बांधताना विरोधकांना विश्वासात घेतलं नाही असा आरोप पवारांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, आता ही वास्तू तयार झाली आहे. या नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं, अशी मागणी आम्हा सर्व विरोधकांची आहे. ती मागणी देखील सत्ताधाऱ्यांनी मान्य केलेली नाही. तसचं, उद्घाटनाचा जो कार्यक्रम ठरला त्याची चर्चाही कधी केलेली नाही त्यामुळे जर विरोधकांना विश्वासात न घेता सर्व निर्णय घ्यायचे असतील तर विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी अशी भूमिका घेतली की आपण संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला जाऊ नये, त्यामुळे माझाही त्या पाठिंबा आहे, असं शरद पवार यांनी म्हंटल.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, अनेक वर्षापासून मी संसदेचा सदस्य आहे. संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचलं. खरं तर नवं संसद भवन उभारण्याचा निर्णय घेत असताना, विरोधकांना विश्वासात घेणं गरजेचं असतं. परंतु केंद्र सरकारकडून विरोधकांना यावेळी विश्वासात घेण्यात आलं नाही. तसंच, भूमिपूजन करताना सुद्धा विरोधकांना विश्वासात घेतलं गेलं नाही.