पवार साहेबांचे एस.टी. कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध- जितेंद्र आव्हाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी चे सरकार मध्ये विलनिकरण करण्यात यावे यासाठी राज्यात एसटी कामगारांनी संप पुकारला असून दिवसेंदिवस संप चिघळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबत मॅरेथॉन मिटिंग घेतली, मात्र चर्चेनंतर देखील ठोस पर्याय न निघाल्याने शरद पवारांवर विरोधकांनी टीका केली आहे. यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला.

गेल्या 40 वर्षांपासून एस. टी. कामगारांच्या समस्या आणि एस.टी. कामगारांशी आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

ऊसतोड कामगारांच्या बैठकीचा अंतिम मसुदा देखील आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत कै. गोपीनाथ मुंडेसाहेब मंजूर करून घ्यायचे. मुंडे साहेबांना ऊसतोड कामगारांबद्दल प्रचंड सहानुभूती होती आणि आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांनीही ऊसतोड कामगारांची जबाबदारी स्वीकारली होती.

नेत्यांनी अत्यंत जबाबदारीने श्रमिकांचा विचार केला पाहिजे. त्यांचे शोषण थांबवल पाहिजे. आणि जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्या शोषणाला, त्यांना उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतात; त्यांना खड्यासारख बाहेर ठेवलं पाहिजे. आणि तेच काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब करतील असेआव्हाड यांनी म्हंटल