Wednesday, October 5, 2022

Buy now

अमरावती हिंसाचार : शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले

पुणे : त्रिपुरा राज्यात घडलेल्या हिंसाचारा नंतर अमरावतीत आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे अमरावतीत घडलेल्या घटनेबद्दल आतापर्यंत 15 गुन्हे दाखल करण्यात आले.

हिंसाचारा नंतर आतापर्यंत 50 आरोपींना अटक करण्यात आली आहे. भाजपने याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत अमरावती बंदची हाक दिलीय. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे

त्रिपुरा येथे समजा काही घडले असे आपण मान्य केले तरी महाराष्ट्रात यामुळे तसे घडण्याचे काही कारण नाही. इथे कोणी काही घडवण्याचा प्रयत्न केला नाही असं म्हणत पवार यांनी आपलं मत व्यक्त केले आहे.

तसेच, दुर्दैवाने अशा काही संघटना आहेत की या प्रकारचे वृत्त समजले की टोकाची भूमिका घेऊन रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करतात. राज्यात मालेगाव, अमरावती, नांदेड या भागात काही घटना घडण्याचे कारण नव्हते. त्यामुळे अशा प्रवृत्तींना किती महत्त्व द्यायचं याचा लोकांनी विचार करायला हवा असंही पवार यावेळी म्हणालेत.

यावेळी, राज्य शांततेच्या मार्गाने वाटचाल करत असताना या ना त्या निमित्ताने अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल अमरावती ग्रामीण भागात बंद पुकारण्यात आला होता. तो शांततेच्या मार्गाने पार पडला. मात्र आता एका राजकीय पक्षाने पुन्हा सबंध जिल्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ काही राजकीय पक्षाचे घटक दुर्दैवाने त्यांच्यामध्ये असलेल्या नैराश्याची प्रतिक्रिया सार्वजनिक शांततेला धक्का बसेल यापद्धतीने व्यक्त करताना दिसत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद गोष्ट आहे असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ज्यांनी राज्य चालवले त्यांनी कमीत कमी राज्याला, सर्वसामान्यांच्या हिताला धक्का न लागेल अशा प्रकारची भूमिका घ्यायला हवी. पण त्याचे भान राहिलेय की नाही याची शंका यावी, अशी स्थिती इथे निर्माण झाली ही दुःखद गोष्ट आहे असं म्हणत पवार यांनी याबाबत दुख; व्यक्त केले आहे.