एटीएम कार्डची अदलाबदल करीत महाराष्ट्रासह विविध राज्यात फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा केवळ २४ तासांत उल्हासनगर- शिरवळ- गोवा व पुन्हा आनेवाडी टोलनाक्यावर आल्यानंतर टप्यात आणून करेक्ट कार्यक्रम शिरवळ (जि. सातारा) येथील पोलिसांनी केला आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेशात विविध पोलिस स्टेशनमधील गुन्हे उघडकीस आले असून ताब्यात घेतलेल्या चौघांकडून तब्बल ६२ एटीएम कार्ड ताब्यात घेतली आहेत.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी, उल्हासनगर (ठाणे) येथील आंतरराज्य टोळी विविध बँकाच्या एटीएम सेंटरमध्ये जावून आबालवृध्द, महिला यांना एटीएममध्ये मदतीचा बहाणा करून कार्डची अदलाबदल करत होते. तसेच रूमालमध्ये कागदाचा नोटांच्या आकाराचा बंडल बनवित कमिशनचे अमिष दाखवून रोख स्वरूपात रक्कम घेवून पळून लोकांची फसवणूक करत. शिरवळ (ता. खंडाळा) येथील एका खाजगी कंपनीमध्ये काम करणारे निलेश शिवाजी सुर्वे हे भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये रक्कम काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्याच्या मागे असलेल्या अज्ञात दोघांनी ते करत असलेले व्यवहार पाहत होते. एटीएम मधून पैसे न निघाल्यामुळे पावती पाहत असतानाच निलेश सुर्वे यांचे कार्ड एटीएम मशीनमधून हातचलाखीने बदलले. तेव्हा त्याच रंगाचे दुसरे एटीएम कार्ड सुर्वे यांच्या हातात दिले. काहीवेळाने निलेश सुर्वे यांना त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातील रक्कम शिरवळ एटीएम सेंटरमधून, वेळे व आसले (ता.वाई) येथील पेट्रोलपंपावरून अचानकपणे ५० हजार आठशे रूपये वजा झाल्याचा मेसेज आला. त्यावेळी निलेश सुर्वे यांनी तात्काळ शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी इसमाविरूध्द फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दाखल केला.
शिरवळ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून यापुर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या जुन्या सीसीटीव्हीचे व गुन्ह्याचे अवलोकन करीत फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस अमंलदार रविंद्र कदम, जितेंद्र शिंदे, अमोल जगदाळे, स्वप्निल दौंड यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे व सीसीटीव्हीची पाहणी करत सदरील गुन्हेगार हे सराईत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार माहीती घेतली असता सराईत गुन्हेगार उल्हासनगर (ठाणे) येथील असल्याची माहीती समोर आली.
सराईत गुन्हेगार हे गोवा राज्यात गेल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानुसार शिरवळ पोलिसांच्या पथकाने गुन्हेगारांचा मागोवा घेतला असता ते परत गोव्यावरून उल्हासनगर (ठाणे) जाणार असल्याची माहीती मिळाली. तेव्हा शिरवळ पोलिसांनी शेंद्रे फाटा व आनेवाडी टोलनाका येथे सापळा रचून थरारक पाठलाग करत आनेवाडी टोलनाका कर्मचारी सहकार्याने मोठ्या शिताफीने नियोजनबध्दरित्या चारचाकी गाडी क्रमांक (एमएच ०४-ईटी- ०३८९) मध्ये असलेले प्रदीप साहेबराव पाटील (वय-२९), विकी राजू वानखेडे (वय-२१), किरण कचरू कोकणे (वय-३५) व महेश पाडुरंग धनगर (वय-३१, सर्व रा. म्हारळगांव, उल्हासनगर- ठाणे) यांना अटक केली आहे. सराईत गुन्हेगारांकडून ६२ विविध बँकाचे एटीएम कार्ड व चारचाकी वाहनांसह ३ लाख ८ हजार शंभर रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत. सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा