सामाजिक कामात जीव ओतणाऱ्या सर्वांसाठीच आपुलकीचे ४ शब्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विशेष 

डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने सामाजिक क्षेत्राचे व्यवहार, वर्तन, कार्यशैली आणि स्वरूप यावर मंथन सुरू झाले आहे. सामाजिक क्षेत्रातील ही पहिली आत्महत्या नसली तरीही बाबा आमटे आणि आनंदवन ही दोन नावे मोठी असल्याने चर्चा होणे अनिवार्य आहे. आत्महत्या ही कुणाचीही असो ती वाईटच गोष्ट आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती निघून जाते त्याची कारणमीमांसा समाज करत राहतो.

आनंदवनला वादविवाद ही काही नवीन गोष्ट नव्हती किंवा सामाजिक क्षेत्रातील वादविवाद ही गोष्ट पण नवीन नाही. कार्यरत असतांना वादविवाद, मतभेद निर्माण होणारच. आरोप प्रत्यारोप देखील होणार. कार्यरत असणाऱ्या लोकांच्या हेतूबद्दल कार्यशैली बद्दल व्यवहारांबद्दल चर्चा ह्या होणारच आणि आनंद वनाबद्दल चर्चा गेली अनेक वर्षे होतच आहेत. कारण सामाजिक कार्य आणि समाजकार्य करणारी संस्था आणि संबंधित व्यक्ती समाजाप्रती जबाबदार आणि उत्तरदायी असते त्यामुळे समाजातील विभिन्न घटक तुमच्या कामाचे कौतुक करतात, प्रेरणा घेऊन कार्यरत होतात तसेच मतभिन्नता देखील मांडतात, टिका करतात.

बाबा आमटे स्वतः म्हणायचे कि मतभेद असलेच पाहिजे पण मनभेद नकोत. मतभेदांनी आपली सीमा ओलांडली की चर्चा थांबून मनभेद निर्माण होतात त्यामुळे माणसे एकमेकांपासून तुटत जातात. त्याचा परिणाम कामावर आणि संबंधित लोकांवर होणे अपरिहार्य असते. आमटे परीवारातील सदस्यांनी मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. मतभेद मिटून सर्व सुरळीतपणे व्हावे ही आनंदवनाशी निगडित अनेकांची इच्छा होती. ती तशी व्यक्त देखील झाली होती. परंतु नेमके कशामुळे डॉ शितल ने जगाचा निरोप घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला हे कळत नाही. तपास होईल कदाचित कारणही कळतील परंतू सामाजिक क्षेत्र आणि कार्यकर्ते यांमधील स्पर्धा , अस्वस्थता यावर मुळातूनच सर्वांनी विचार करायला हवा.

खर तर सामाजिक कार्य ही ऐच्छिक बाब आहे. अनेक लोक विविध प्रेरणांनी आपापले सामाजिक योगदान देत असतात. भारतीय समाजात सामाजिक कार्य हे व्यावसायिक मानले जात नाही. त्यामुळे या क्षेत्रातील देवाणघेवाण आणि यशापयशाचे निकष व्यावसायिक क्षेत्रापेक्षा भिन्न राहिले आहेत. परंतु गेल्या काही वर्षात विशेषतः 1975 नंतर सामाजिक क्षेत्रातील संस्थांना एनजीओ Non Government Organization हा शिक्का बसला आणि सामाजिक क्षेत्राचे स्वरूप बदलायला लागले. अनेक चांगली कामे देखील या नवीन प्रारूपात देशभरात उभी राहिलीत. समाज देखील चांगल्या कामाला आपल्याला परीने सहकार्य करीत राहीला. सामाजिक संस्थांचे मूळ भांडवल आणि जमेच्या बाजू म्हणजे उदात्त ध्येय आणि ते प्राप्त करण्यासाठीची तळमळ , सोबतच लोकांची साथसोबत. याच भान कमीकमी होत गेले. एखादे टपरीवजा दुकान सुरू करावे तशा एनजीओ सुरू झाल्या. लोकांशी/ध्येयाशी नाळ तुटली आणि संस्था संकटात सापडल्या आणि बंद पडल्या.

कलांतराने फंडीग एजन्सी नावाचा घटक सामाजिक क्षेत्रात प्रभावीपणे आला आणि सामाजिक क्षेत्राचे स्वरूप आणि चारीत्र्य बदलत गेले. फंडीग कसे मिळवावे याचे फंडे तयार होत गेले. लोकां पेक्षा फंडीग एजन्सी चे प्राधान्यक्रम कामात आलेत. आणि अपवाद वगळता ध्येयासाठी काम न राहता फंडीग एजन्सी साठी काम असे स्वरूप सामाजिक संस्थांचे झाले . कार्यकर्ते कर्मचारी झाले आणि संस्था चालक /विश्वस्त मालक झालेत. सामाजिक कार्याला योग्य आर्थिक आधार लागणारच पण बाबा आमटे म्हणायचे की दान माणसाला नादान बनवते आणि सामाजिक क्षेत्रात हेच वेगाने घडत गेले. व्यावसायिक क्षेत्रातील पैशाचे स्थान आणि सामाजिक क्षेत्रातील पैशांचे स्थान यातील मूलभूत फरक विसरला गेला.

सामाजिक क्षेत्रातील आर्थिक वास्तव आणि व्यवस्थापन त्यामुळे कायमच वादग्रस्त आणि दांभिक राहिले. आर्थिक विषमता सामाजिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. त्यामुळे संस्था चालक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील ताणतणाव/वाद वाढत जाऊन स्पर्धा देखील वाढत गेली. यामुळे अनेक संस्था प्रकल्पग्रस्त होत संपल्या. अनेक कार्यकर्ते नैराश्याने घेरले गेलेत.कौटुंबिक कलह निर्माण झाले. हे आपल्या कडील सामाजिक क्षेत्राचे कठोर वास्तव आहे. अनेक कार्यकर्ते व्यसनाधीन झाले संपले. यावर अधूनमधून चर्चा चिंता व्यक्त होत गेली. पण सामाजिक क्षेत्रातील ताणतणाव आणि स्पर्धेचे वास्तव कायम आहे. हा ताण कमी होण्यासाठी संस्थेच्या अंतर्गत संवाद आणि लोकशाही ही जीवनमूल्ये याचा मनापासून स्विकार होणे गरजेचे आहे.

खरतर सामाजिक कार्य हा आनंदाचा आणि स्वतःला माणूस म्हणून सम्रुद्ध करणारा प्रवास असायला हवा. असे झाले तरच समाज त्या कामापासून किंवा व्यक्तीपासून प्रेरित होऊन जगण्याच्या नाविण्यपूर्ण वाटा शोधेल. प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी नवनवीन साधने आणि व्यवस्था तयार करेल. सामाजिक संस्था या सामाजिक दिशा देणार्या प्रयोगशाळा असायला हव्यात. समाजाला पटले तर समाज प्रयोग स्विकारतो. परंतु सामाजिक संस्ंथांनी स्वतःला नको तेवढे व्यापक बनवत नेल्याने देखील सामाजिक संस्थांवरील ताणतणाव वाढत गेल्याचे दिसते.

सामाजिक कार्य हे स्पर्धेचे नसून सहकार्य आणि समन्वयाचे आहे. येथील कार्यरत राहण्याचा आणि बदलाचा वेग हा व्यवसाय क्षेत्रा पेक्षा कमी आहे. कारण सामाजिक क्षेत्र हे समाजाप्रती संवेदनशीलता आणि करूणा असणार्या लोकांचे आहे.पूर्वी आनंदवनसकट सर्वत्र सामाजिक क्षेत्रातील लोकांचे अभ्यासवर्ग व्हायचे त्या प्रक्रिया आता बंद पडल्या आहेत. एकमेकांना आधार देणार्या यंत्रणा अगदीच क्षीण झाल्या आहेत. कारण सामाजिक क्षेत्राचे नको ते अतीव्यावसायीकरण हे आहे.

सर्वात कहर म्हणजे ज्या सामाजिक संस्थांनी समाजाला सक्षम करण्याचे मार्ग दाखवले पाहिजे त्या ठिकाणी आता सामाजिक संस्था सक्षमीकरणाचे व्यावसायिक प्रशिक्षण सुरू झाले आहेत. सामाजिक क्षेत्रातील ताणतणाव आणि अस्वस्थता वेळीच ओळखून या क्षेत्रातील लोकांनी मंथन केले पाहिजे. कारण आपल्याला समाजाचा उद्धार करायचा नसून समाजाला स्वस्थ राहण्यासाठी मार्ग शोधन करायचे आहे. यानिमित्ताने सामाजिक क्षेत्रात व्यापक चिंतन होईल आणि कुठल्याही परिस्थितीत सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या माणसाचा बळी जाणार नाही याची दक्षता सर्वानाच घ्यावी लागणार आहे.

लोकमित्र संजय का. सोनटक्के
लोकसहजीवन मिशन(लोकग्राम)
9822469495

Leave a Comment