Wednesday, March 29, 2023

औरंगाबादेत शिवजयंतीला गालबोट ; मिरवणुकीत तरुणाची भोसकून हत्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  । शिवजयंती मिरवणुकीत झेंडा फिरविण्याच्या कारणावरून बुधवारी रात्री दोघांनी 21 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यार भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली मात्र एकजण फरार झाला आहे. जो पर्यंन्त दुसऱ्या आरोपीला अटक होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. तर पुंडलिकनगर भागातील बाजारपेठतील दुकाने तरुणांनी बंद केली होती.

बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास श्रीकांत गोपीचंद शिंदे या 21 वर्षीय तरुणाची झेंडा दिला नाही. या रागातून राहुल सिद्धेश्व भोसले व विजय शिवाजी वैध या दोघांनी धारदार तीक्ष्ण हत्याराने पोटात भोसकून हत्या केली. हत्येनंतर पसार झालेला आरोपी विजय वैधला पुंडलिकनगर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. मात्र या घटनेतील प्रमुख आरोपी राहुल भोसले हा अद्याप फरार आहे. आरोपी पकडण्यात आल्याची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी पुंडलीकनगर पोलिस ठण्यासमोर गर्दी केली होती.

त्यामुळे काही काळ ठण्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुख्य आरोपी भोसले जो पर्यंत अटक होत नाही. तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या आरोपिला देखील लवकरच अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर हा जमाव पोलीस ठाण्यातून निघून गेला. मात्र दुपारपर्यंत मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.