Wednesday, October 5, 2022

Buy now

टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाची मारहाण; गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साधारण महिनाभरापूर्वी, वरोरा शहरातून कोळसा कंपन्यांच्या ट्रकांना मनाई करण्यात यावी, यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक का जाऊ दिले जात असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुखांना दिसून आलं. त्यानंतर स्थानिक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मनाई केल्यावरही या टोलनाक्यावरून वरोरा शहरात कोळसा आणि जड वाहतुकीचे ट्रक का जाऊ देता? असा जाब शिवसेना जिल्हाप्रमुखांनी विचारला. यानंतर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारुन मारहाण करण्यात आली.

दरम्यान, याप्रकरणी कायदा हातात घेऊन अशा प्रकारे मारहाण आणि शिविगाळ केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवीगाळ, हातबुक्क्याने मारहाण करणे आणि नुकसानीची धमकी देण्याप्रकरणी जिल्हाप्रमुख यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.