कर्मचाऱ्यांनो भाजप नेत्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, पगार ते करणार नाहीत; अनिल परबांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भाजप नेते सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती लावत त्यांच्याकडून राज्य सरकावर आरोप केले आहेत. यावरून शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. “विलिनीकरणाची मागणी 1-2 दिवसांत पूर्ण होण्यासारखी नाही. यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. एसटी कामगारांनो तुम्ही कामावर आला नाहीत तर पगार होणार नाही. तुमच्या पगाराची जबाबदारी भाजप नेते घेणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाषणबाजीला बळी पडू नका,” असे परब यांनी आवाहनही केले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत व मागण्यांबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या केला आहेत. त्यांच्या काही मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. तर काहींबाबत दिवाळीनंतर एकत्रित बसून दोडगा काढू असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, तरीही भाजप नेत्यांच्या भाषणबाजीला बळी पडून आंदोलन केले आहे.

राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेत आहे. या कामगाराने आंदोलनामुळे जर नुकसान झाले तर त्याला भाजपमधील नेते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे पगाराची जबाबदारी घेणार आहे का? हेपण त्यांनी सांगावे. कारण आता सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे काम नाही तर पगार नाही होणार. त्यामुळे पगारही कापले जाणार आहेत. त्यातून जे नुकसान होणार आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? हे नेते भरून देणार आहेत का? त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता संप, आंदोलन न करता कामावर रुजू व्हावे, असे मंत्री परब यांनी सांगितले.