हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीवरून भाजपकडून राज्य सरकारवर टीका केली गेली होती. आता कोरोनाचे प्रमाण कमी झालत्याने लॉकडाउनच्या नियमांत शिथिलता देण्यात आली असल्याने भाजपकडून पुन्हा टीका केली जात असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. भाजपच्या आंदोलनानंतर लॉकडाऊन उघडले नाही तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले. तेव्हा आता आम्हालाही जगू द्या आणि तुम्हीही जगा, असा टोला सामना अग्रलेखातून राऊतांनी म्हंटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्राने कोणत्याही बाबतीत घिसाडघाई न करता अत्यंत सावधपणे लॉक डाऊनचे टाळे उघडले आहे. दिवाळीपूर्वी सरकारने निर्बंध शिथिल केले असून दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याचा परवानाच जनतेला दिला. काही दिवसांपूर्वी राज्यातील विरोधी पक्षाने निर्बंधांच्या बाबतीत विनाकारण गोंधळ घातला. मंदिरे, सण, उत्सवांवर निर्बंध घालणारे सरकार हिंदूविरोधी असल्याचे ते बोंबलत होते. या मंडळींनी रस्त्यावर येऊन घंटाही बडवल्या होत्या. त्यांनी घंटा बडवल्या म्हणून सरकारने मंदिरे उघडली नाहीत, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले.
आपल्या प्रिय पंतप्रधानांनी ‘थाळ्या वाजवा कोरोना पळवा’ असा दिव्य संदेश दिलाच होता. पण थाळ्या वाजवून उपयोग झाला नाही व कोरोनामुळे जशा जागोजाग चिता पेटल्या तशी गंगेच्या प्रवाहातही शेकडो प्रेतांना जलसमाधी देण्यात आली. त्यामुळे थाळ्या आणि घंटा यापेक्षा विज्ञान, वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर लोकांचे प्राण वाचवत असते. ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला असल्याचे राऊतांनी म्हंटले आहे.