व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राजकीय उडी फसली…शिवसेना कधी पाठिमागून वार करत नाही : संजय राऊत

कोल्हापूर | मला जसा शाहू महाराजांविषयी आदर आहे. तसंच संभाजीराजेंवर माझं प्रेम आहे. आम्हाला त्या वादावर राजकारण करायचं नाही. ज्यांनी संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची उडी फसली आहे. त्यांनी उडी मारण्याची प्रयत्न केला. पण शिवसेनेचं मन साफ आहे. शिवसेना कधी पाठिमागून वार करत नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.

शिवसेना नेते संजय राऊत हे दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही तेव्हाच भूमिका स्पष्ट केली होती. दोन जागा शिवसेनेच्या आहेत. तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर शिवसेनेत या असं आम्ही संभाजीराजेंना सांगितलं होतं, असा पुनरुच्चार राऊत यांनी केला. तसेच छत्रपतींना समर्थक नसतात. संपूर्ण प्रजा छत्रपतींची असते, असंही राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी आदरणीय आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराजांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचं कौटुंबिक नातं होतं, आजही आहे. काल श्रीमंत शाहू छत्रपती भूमिका घेतली. त्यावर मी इतकंच म्हणालो की, कोल्हापूरच्या मातीत प्रामाणिकपणा आणि सत्य जिवंत आहे. शाहू घराण्याने आपली सत्यवादी परंपरा कायम ठेवली. मी कोल्हापूरला आहे. शाहू महाराजांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेईन.

संजय राऊत आणि शाहू महाराजांची आज भेटीची शक्यता

संजय राऊत आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. या भेटीत संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय इतर राजकीय चर्चाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राऊत आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शिवसेना नेते अरुण दुधवडकरही उपस्थित राहणार आहेत.