उदयनराजे साताऱ्याच्या विकासाला लागलेले ग्रहण : शिवेंद्रसिंहराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनलने खासदार उदयनराजे भोसले यांनी पुरस्कृत केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा पराभव करत १८ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला. यावेळी शिवेंद्रसिहराजे यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. ‘सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे आहे. ते ग्रहण नगरपालिकेतून सोडवायचं आहे,’ अशी टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.

शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नुसतं घराण्याचं नाव आणि घराण्याच्या नावावर मत मिळवण्याचे दिवस उदयनराजे यांचे संपले आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं. स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करत राहणं ही उदयनराजेंनी पद्धत बंद करावी. उदयनराजेंनी सातारकरांसाठी काहीतरी करून दाखवावं. ही निवडणूक उदयनराजेंनी शेतकरी संघटनेचा मुखवटा घालून लढवली होती.

सातारा विधानसभा, कोरेगाव आणि कराड येथे उदयनराजेंची काय ताकद राहिली आहे हे या निकालातून दिसून येत आहे. बाजार समिती तो झाकी है, नगर पालिका अभी बाकी है. सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे आहे. ते ग्रहण नगरपालिकेतून सोडवायचं आहे, असं सांगत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर खरपूस टीका केली.