हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत आहेत. याच दरम्यान, मातोश्रीवर गेलेल्या एका शिवसैनिकाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सगळीकडे हळहळ व्यत्क्त केली जात आहे.
भगवान काळे असे सदर शिवसैनिकाचे नाव असून ते शहापूर तालुक्यातून आले होते. मातोश्रीवर बैठकीचं सत्र सुरु असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्यांना हृदय विकाराचा धक्का बसला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदार असून उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असा दावाही करण्यात आला आहे. शिंदे यांच्या बंडखोरी नंतर अनेक शहरातील नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी मातोश्रीवर जात आहेत