राहुल गांधी प्रामाणिक योद्धे, भाजपला त्यांचे भय 100 पटीने – शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत असा प्रचार करूनही श्री. गांधी अद्याप उभेच आहेत. ते मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्य़ांना वाटते. तसे नसते तर ऊठसूट गांधी परिवाराच्या बदनामीच्या शासकीय मोहिमा राबविल्या गेल्या नसत्या, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटत असते. त्यातही प्रामाणिक योद्ध्याचे भय शंभर पटीने वाढत जाते, असे म्हणत राहुल गांधींविषय़ी वाटणारे भय शंभर पटीतले असल्याचा दावा शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातुन करण्यात आला.

मुलुंडच्या तोतऱ्या पोपटाने नेत्याने ईडी वगैरे संस्थांकडे भ्रष्ट नेत्यांचे पुरावे मधल्या काळात दिले आहेत. या नेत्यांवर ईडी अजून कारवाई का करत नाही? असे ज्यांच्याविषयी विचारले जात होते; ते सर्व लोक भाजपवासी झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी त्या पुराव्यांची सुरनळी केली आहे का?’ असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखातून केला आहे. तसेच, परदेशातून काळे धन आणायची गर्जना पंतप्रधान मोदी यांनीच केली. या काळय़ा धनवाल्यांनी पीएम केअर्स फंडात गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे. याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे? असा रोखठोक सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे.

रॉबर्ट वढेरा हे भाजपच्या टीकेचे नेहमीच लक्ष्य राहिले आहेत. पण गेल्या सहा-सात वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. गांधी परिवाराविरोधात सर्व आयुधे वापरून झाली आहेत. हे फक्त रॉबर्ट वढेरा यांच्याबाबतीत घडतेय असे नाही. भाजपच्या विरोधात उभे राहणाऱ्य़ा प्रत्येक व्यक्तीवर असा हल्ला सुरू आहे,” असा गंभीर आरोप शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून केला आहे. तसेच राजकीय विरोधकांच्या पैशांचे व्यवहार खणून काढले जात आहेत. यामध्ये लिंबू लागला तरी भोपळा हाती आल्याची बोंब मारली जात असल्याची खोचक टीका शिवसेनेने केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like