छोटा बांधकाम व्यावसायिक ते राजकारणी; ‘ईडी’ची पीडा मागे लागलेल्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांचा प्रवास नेमका कसा आहे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षणाचा आणि तुमच्या यशस्वीे होण्याचा तसा काडीमात्र संबंध नाही. पण जे परदेशातल्या नामवंत विद्यापीठात शिकून आलेल्या भल्या-भल्यांना जमलं नाही ते एका दहावी पास असणाऱ्या तरुणाने करून दाखवलं असचं प्रताप सरनाईक यांच्या विषयी म्हणता येईल. इंदिराबाई आणि बाबुराव या दाम्पत्याच्या पोटी १९६४ साली वर्धा जिल्ह्यात प्रतापरावांच्या जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच असल्यामुळे नेहमीच आर्थिक चणचण भासत होती. परिणामी बाबुराव सरनाईक हे आपला कुटुंब-कबिला घेऊन नोकरीच्या शोधार्थ मुंबईत आले. आणि येथूनच सुरू झाला प्रताप सरनाईक यांचा उत्तुंग प्रवास.

घरी आई-वडिलांना कामात मदत करणे, वेळ प्रसंगी भाजीपाला विकणे. थोडी समज आल्यावर सरनाईकांनी रिक्षा देखील चालवली असल्याचे त्यांचे काही मित्र सांगतात. दहावीनंतर शिक्षण घेण्याची इच्छा होती. कॉलेजला ऍडमिशन देखील घेतलं पण आर्थिक भार असह्य होत असल्यामुळे फक्त दहावी पास झाल्यानंतर त्यांनी शिक्षणाला राम-राम ठोकला आणि पुन्हा भाकरीचा चंद्र शोधण्यात काही दिवस गेले. आणि याच प्रवासात त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभव आले. काही दिवसानंतर लग्न झालं. परिशा या त्यांच्या सौभाग्यवती.

नेहमीच काहीतरी नवीन करण्याची उर्मी त्यांच्यात होती आणि त्यातून सुरू झाला एक प्रवास. १९८५ साली ते मुंबईतून ठाण्यात स्थलांतरित झाले. ठाण्यात थोडे स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी १९८९ साली त्यांनी ” विहंग ग्रुप ” या नावे एका छोट्याश्या बांधकाम व्यवसायाला सुरवात केली. कामाची चिकाटी आणि जिद्द यातून त्यांचा हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. विहंग शांतीवन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग विहार, विहंग कॉम्प्लेक्स, विहंग अर्काईड असे एक – एक प्रोजेक्ट पूर्ण करत सरनाईक ठाण्यातून थेट मुंबई आणि पुण्यात पोहोचले.

सरनाईकांना ओळखणाऱ्या अनेक लोकांनी तर इथवर सांगितले की त्यांचा हा व्यवसाय परदेशात देखील विस्ताराला आहे. सोबत लवकरच त्यांची सगळीच फॅमिली तिकडे विदेशात स्थलांतर करेल. अशी देखील चर्चा आहे. खर -खोटे तेच जाणो. पण फक्त एवढ्यावरच सरनाईक थांबले नाहीत. तर ते हॉटेलिंग क्षेत्रात देखील उतरले आहेत. “विहंग इन” या नावे त्यांचे एक थ्री स्टार हॉटेल देखील आहे. सोबतच ” विहंग पाल्म” या नावे एक क्लब देखील आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीत जमा केलेल्या शपथ पत्रात त्यांनी १४३ कोटी रुपयांची मालमत्ता दाखवली होती.

प्रताप सरनाईक यांचा राजकीय ग्राफ देखील तसाच काहीसा आहे. २००५ च्या सुमारास सरनाईक जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्याच बळावर ते नगरसेवक झाले.पण २००९ साली विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदारकीचे तिकीट कापले म्हणून सरनाईक बंडखोरी करत शिवसेनेत गेले. २००९, २०१४ आणि २०१९ या तिन्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्रताप सरनाईक हे सलग तीन वेळेस ओवळा – माजिवाडा या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. प्रताप सरनाईक सध्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आणि शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून त्यांची ओळख आहे. नुकतीच सक्तवसुली संचालनालय मार्फत त्यांच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आली. त्यामुळे ते खूप चर्चेत आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment