बाबरी केस पासून अनेक खटले मी अंगावर घेतले, हा तर.. ; राऊतांचे कंगनाला चोख उत्तर

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि मुंबई महापालिका प्रकरणावर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. कंगनाने मुंबई महापालिकेकडून आपल्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत कंगनाकडून कारवाईचा आदेश देणारा अधिकारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारपर्यंत संजय राऊत आणि अधिका-यांना बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

“एका अभिनेत्रीने उच्च न्यायालयात महापालिकेविरोधात बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात आल्याने खटला दाखल केला असून मला प्रतिवादी बनवण्याची मागणी केली आहे. बाबरी केस ते मराठी अभिमानासाठी उभं राहण्यापर्यंत अनेक खटले मी अंगावर घेतले आहेत. ही गोष्ट मला माझं शहर आणि महाराष्ट्राच्या अभिमानासाठी लढण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. त्यांनतर कंगना आणि मुंबई महानगर पालिका यांच्यातील वाद न्यायालयात पोहोचला होता. त्यानुसार २५ सप्टेंबरपर्यंत कंगनाच्या कार्यालयामधील तोडफोडीला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. संजय राऊत आणि वॉर्ड अधिकारी यांना प्रतिवादी करण्याची मागणी कंगनाच्या वकिलांकडून करण्यात आली.

कंगनानं पालिकेविरोधात हायकोर्टात केलेल्या याचिकेत संजय राऊत आणि पालिकेचो वार्ड अधिकारी यांना प्रतिवादी बनवण्याची मागणी केली. उद्या, बुधवारपर्यंत राऊत आणि पालिका अधिकारी भाग्यवान लोटे यांना बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संजय राऊतांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना ‘उखाड डाला’ अशा आशयाची प्रतिक्रिया दिल्याचे पुरावे कंगनाकडून न्यायालयापुढे सादर करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयानं कंगनाला दिलेला दिलासा तूर्तास कायम आहे. यासंदर्भात शुक्रवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like