बेताल राज्यकर्त्यांना वेसण घालण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते ; राऊतांचा निशाणा भाजपवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आज बाळासाहेब हवे होते, बेताल राज्यकर्त्यांना वेसण घालण्यासाठी आज बाळासाहेब ठाकरे हवे होते. हम करे सो कायदा ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी बाळासाहेब हवेच होते, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले आहे.

बाळासाहेब ठाकरे हे एक अफाट व्यक्तिमत्त्व, आज ते हवेच होते. पंजाबच्या शेतकऱ्य़ांची साठ दिवस टोलवाटोलवी सुरू आहे. ते पाहिल्यावर अनेकांना वाटलं सरकारचे कान उपटून हातात द्यायला बाळासाहेब हवे होते. त्यांच्या आठवणीने आजही महाराष्ट्र आणि देश रोमांचित होऊन उठतो. कारण देश पेटविण्याची किमया त्यांनी वारंवार केली. आज असे नेतृत्व दिसत नाही.’, असे म्हणत बाळासाहेबांची उणीव दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

काश्मिरातील अतिरेक संपलेला नाही. पण माझ्या शिवसैनिकांच्या हातात एके-४७ द्या, काश्मिरातील दहशतवाद संपवून दाखवतो, असे ठणकावणारे बाळासाहेब आज हवे होते. अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही अशी ‘गिधड’ धमकी देताच केंद्र सरकार गर्भगळीत झाले, पण मुंबईतल्या हिंदुहृदयसम्राटाने उलटखाती त्या धमकीच्या ठिकऱ्या उडवत गर्जना केली. अमरनाथ यात्रा होणारच, एका जरी यात्रेकरूच्या केसाला धक्का लागला तर याद राखा. हजला जाणारे एकही विमान उडू देणार नाही, असे ठणकावताच अतिरेक्यांचा मामला थंड झाल्याची आठवण राऊत यांनी ताजी केली.

बेताल राज्यकर्त्यांना वेसण घालण्यासाठी आज बाळासाहेब ठाकरे हवे होते. ‘हम करे सो कायदा’ ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी बाळासाहेब हवेच होते. नोटाबंदी, लॉक डाऊनसारख्या संकटांनी हतबल झालेल्या सामान्य माणसाला बळ देण्यासाठी बाळासाहेब हवे होते. असं संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like