हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन सरकार वर टीका करताना एखादा अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावर आधारित आरोप करणं हे दुर्दैवी आहे,’ असं म्हणल होत. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.
ज्या अधिकाऱ्यांची वकिली फडणवीस करताहेत, त्यांनी आतापर्यंत अनेक संशयास्पद प्रकार केले आहेत. रिया चक्रवर्तीलाही असंच अडकवण्यात आलं होतं. तिच्यावर अद्याप आरोपपत्र दाखल झालेलं नाही. ही सरळ सरळ खंडणीखोरी आहे, हे आता स्पष्ट झालंय. अशा खंडणीखोरांची वकिली फडणवीस करत आहेत. त्यांच्या सारख्या चांगल्या, सुसंस्कृत नेत्याचं अध:पतन बघवत नाही,’ असा खोचक टोला राऊत यांनी हाणला आहे.
केंद्र सरकारचा फार मोठा कट आणि डाव आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. मुंबई पोलीस, सिनेसृष्टी, राज्य सरकार, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र मंत्रिमंडळ असेल त्यांचे राज्य आले नाही. त्यांचा मुख्यमंत्री झाला नाही त्यामुळे त्याचा राग हे अशाप्रकारे काढत आहेत. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे कधीही झुकणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर कितीही करा आम्ही आमचे काम करत राहू असे संजय राऊत म्हणाले.