कुणी कितीही कंड्या पिकवल्या तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार कार्यकाळ पूर्ण करेल -संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यासाठी सक्षम आहेत. कुणी कितीही कंड्या पिकवल्या, ढोल बडवले, तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार कार्यकाळ पूर्ण करेल याची खात्री देतो, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांशी संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा झाल्याचं संजय राऊतांनी सांगितले. संघटना बळकट असेल तर सरकार आहे त्यापेक्षा मजबूत होईल, सरकारी प्रदीर्घ काळ टिकेल, मुख्यमंत्री आमचाच राहील. त्यासाठी संघटनात्मक चर्चा झाली असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान देशात तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना-काँग्रेस या आघाडीत असावी असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले त्यात चूक नाही. आज आम्ही यूपीएत नाही आणि एनडीएतही नाही. देशपातळीवर विरोधी पक्षांची भक्कम आघाडी पर्याय म्हणून उभी राहात असेल, तर पवारांच्या भूमिकेत चूक नाही, असे राऊत यांनी म्हटले.