गुजरात विकासाच्या मार्गावर होतं तर मुख्यमंत्री बदलायची वेळ का आली? शिवसेनेचा खोचक सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात विधानसभा निवडणुकांना जवळपास एक वर्ष बाकी असताना भाजपने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा घेऊन भुपेंद्र यादव यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. गुजरातमधील याच नेतृत्वबदलावरुन शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन आता भाजपावर निशाणा साधलाय. गुजरात विकासाच्या मार्गावर होतं तर मुख्यमंत्री बदलायची वेळ का आली असा खोचक सवाल शिवसेनेने केला आहे.

फार झोतात नसलेल्या लोकांच्या हाती सत्ता देणे हेच मोदी राजकारणाचे तंत्र आहे. गुजरातमध्ये तेच घडले. मोदी यांनी अनेकदा अचानक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. महाराष्ट्रातही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देऊन ‘धक्का’ दिला होता. आता गुजरातमध्येही त्याच ‘धक्कातंत्राचा वापर झाला आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते मुख्यमंत्री असा आहे. पक्षनेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागेल. असे शिवसेनेने म्हंटल.

मावळते मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या काळात गुजरातमध्ये भाजप रसातळाला जात होती. कोविड- कोरोना काळात सरकारी यंत्रणा साफ कोलमडली, गावागावांत मृतांच्या चिता पेटत राहिल्या, सरकार हतबल व हताश होऊन मृत्यूचे तांडव पाहत होते हा संताप लोकांत होता व आहेच. गुजरातमध्ये बेरोजगारीचा भस्मासुर नाचतो आहे. अनेक मोठे उद्योग बंद पडले आहेत. संपूर्ण गुजरातमधील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण आक्रोश करीत आहेत व निवडणुकांत या संतापाचा फटका बसेल ही खात्री असल्यानेच मुख्यमंत्री रूपाणी यांना बदलून भूपेंद्र पटेल यांना नेमले असे शिवसेनेने म्हंटल.

लोकशाहीचे, राज्यकारभाराचे व विकासाचे गुजरात मॉडेल अशा प्रकारे फुगा फुटावा तसे टपकन फुटले आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्भावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? असा सवाल शिवसेनेने केला. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय? असे शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हंटल.

Leave a Comment