व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिवसेना- राष्ट्रवादी फोडणारा औरंग्या अजूनही जिवंत; ठाकरेंचा भाजपवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगजेब जीवंत आहे. शिवसेना फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. ही औरंग्याची वृत्ती भाजपमध्ये आहे. औरंग्यानेच शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात संयुक्त मेळावा मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोदी शाह यांच्यासह महाराष्ट्र भाजपवर घणाघात केला.

आज देखील औरंगजेब जिवंत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जिवंत आहे का? फडणवीससाहेब, तुमच्या पक्षात आहेत. औरंगजेब तुमच्यामध्ये दडला आहे. पण आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हे मराठ्यांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायला अफजल खान आला होता. त्याचं थडग प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधलं आहे. जे कोणी भगव्यावरती चाल करत आले त्याचे थडगे महाराष्ट्राने बांधले. हे महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. औरंग्याची औलाद महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोकं भांडतील. परस्पर मरतील. माझ्या कपड्यावरती डाग नाही. ज्यांचे कपडे धुऊन पाहिजे असतील आमच्याकडे या, अशी भाजपची नीती असल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही. आम्हाला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. मी भाजपला सोडलं, पण हिंदुत्वाला नाही सोडलं असं म्हणत हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.