हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चीनची साम्राज्यवादाची राक्षसी भूक पाहता हिंदुस्थानला आता गाफील राहून चालणार नाही. भारतीय सैन्याची चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर असली तरी धोकेबाज चीनच्या कपटनीतीवरही लक्ष ठेवावेच लागेल, असा सल्ला सामना अग्रलेखातून केंद्र सरकारला दिला आहे.
अरुणाचलपासून लडाखपर्यंत चिनी उंदरांनी सीमा कुरतडण्याचा उद्योग सुरु केला आहे. चार किलोमीटरपर्यंत घुसखोरी करायची आणि चर्चेच्या फेऱ्यांत अडकवून दोन किलोमीटर माघार घ्यायची अशी बदमाशी चीनने सुरु केली आहे. सैन्याची संपूर्ण माघार झालेली नसताना चीनने लढाऊ विमानांसह सीमेवर सुरु केलेला युद्धसराव म्हणजे धोक्याची पूर्वसूचना आहे. भारतीय सैन्याची चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर असली तरी धोकेबाज चीनच्या कपटनीतीवरही लक्ष ठेवावेच लागेल, असा सल्ला शिवसेनेने मोदी सरकारला दिला आहे.
कपटनीती आणि कावेबाजपणा हा चीनच्या परराष्ट्र धोरणाचा पाया आहे हे आजवर अनेकदा सिद्ध झाले. एकीकडे चीन मैत्रीचा हात पुढे करून शांततेची बोलणी करतो आणि दुसरीकडे पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात करतो. याचे अनेक कटू अनुभव आपल्या गाठीशी आहेत. तरीही आपण पुनः पुन्हा चीनवर विश्वास ठेवतो आणि प्रत्येक वेळी चीनकडून दगाबाजी होते. आताही तसेच घडताना दिसत आहे, असं अग्रलेखात म्हटलंय.
हिंदुस्थान-चीनच्या सरहद्दीवरून येणाऱ्या ताज्या बातम्या पाहता चीनचे इरादे काही स्वच्छ दिसत नाहीत. लडाखच्या सीमा भागात चीनने नव्या कुरापती सुरु केल्या असून, तिथे चिनी सैन्याच्या कारवाया झपाट्याने वाढताना दिसत आहेत. दरम्यान, सीमेजवळ चीनने अचानक युद्धसराव सुरु केला आहे. उभय देशांमध्ये शांततेची बोलणी सुरु असताना आणि सीमेवर संघर्ष वाढणार नाही याची काळजी घेण्याचा शब्द दोन्ही देशांनी एकमेकांना दिला असताना चीनने सुरु केलेला हा युद्धसराव चिथावणीखोरच म्हणावा लागेल, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.