धक्कादायक ! 16 वर्षीय मुलीचे 28 वर्षीय तरुणासोबत लग्न लावण्याचा प्रयत्न

औरंगाबाद – केंद्र सरकार मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा 18 वरून 21 करण्याच्या प्रयत्नात असतानाच औरंगाबाद शहरात मात्र 16 वर्षीय मुलीचे लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाल कल्याण समितीला या लग्नाबाबत माहिती मिळाल्यानंतर हा बालविवाह थांबण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील शेतकरी कुटुंबातील 16 वर्षीय मुलगी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव-कडेगाव येथील 28 वर्षीय सचिन नारळे याचा विवाह 24 डिसेंबर रोजी मुकुलनगर येथील सप्तशृंगी माता मंदिरात आयोजित करण्यात आला होता. मुलीचे शिक्षण 10 वीपर्यंत झाले आहे. सचिनची शेती चांगली असल्याने मुलीच्या आई-वडिलांनी 16 व्या वर्षीच तिचे लग्न लावून देण्याचे ठरवले होते.

या बालविवाहाची माहिती मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना कळताच त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना कळवले. सहायक निरीक्षक शिवाजी चौरे यांनी घटनास्थळी जात लग्न थांबवले बाल कल्याण समितीच्या तक्रारीवरून मुलीच्या वडिलांसह सचिन नारळे, सुमनबाई नारळे, कचरू नारळे यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे