देवऋषीकडून उपचार देताना १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू ; साताऱ्यातील धक्कादायक घटना

सातारा | सातारा जिल्ह्यातील शिंदी या गावात 14 वर्षीय मुलीच्या मृत्युस कारणीभुत ठरल्या प्रकरणी दोन भोंदुबाबांवर जादु टोणा कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारावर ऊत्तम अवघडे आणि रामचंद्र सावंत या दोन भोंदू वर जादूटोणा विरोधी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा अंधश्रद्धेची बाब समोर आली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे, शिंदीगाव येथील 14 वर्षाच्या मुलीचे सतत डोके दुखून तिला ताप आला होता. स्थानिक डॉक्टरांनी प्रथमोपचार करून तिला घरी पाठवले. परंतु तिच्या कुटुंबियांनी तिला दुपारी गोंदवले येथील एका देवऋष्याकडे घेऊन गेले. देवऋष्याने तुमच्या घराशेजारील बारव आहे, तेथील भूत मुलीला लागले आहे. आमावस्येपर्यंत ठीक होईल असे सांगून मंत्रतंत्र करून परत पाठविले.

नंतर संध्याकाळी मुलीला जास्त त्रास झाल्याने पुन्हा मोही येथील रामचंद्र सावंत या देवऋष्याकडे मुलीला नेण्यात आले. याही देवऋष्याने मुलीला बारवीतले भूत लागले आहे. व पौर्णिमेपर्यंत देव बांधलेले आहेत. आणि ते ठीक होणे खूप कठीण आहे. 20 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तिला भयंकर धोका आहे असे सांगून मंत्रतंत्र करून अंगारे-धुपारे देऊन परत पाठवले.

मुलीला घरी आणल्यानंतर सगळे कुटुंब मुलीला गराडा घालून बसले होते. मुलगी शांत बसली होती. तिचे हात पाय थरथर कापत होते. पण तरीही सगळ्यांच्या नजरा घड्याळ्याच्या काट्याकडे 12 वाजण्याची वाट बघत होते. त्यातच 12 ला 5 मिनिटे कमी असताना ती मुलगी निपचित पडली व निधन पावली. या घटनेमुळे देवऋष्याने सांगितल्याप्रमाणे खरोखरच तिला भूताने नेले ही बाब देवऋषीवरील विश्‍वास दृढ होण्यास कारणीभूत ठरली. कुटुंबियांनी या गोष्टीचा बोभाटा न करता मुलीचा मृतदेह जवळ असलेल्या ओढ्याशेजारी पुरला.

या घटनेची माहिती दहिवडी येथील सुनिल काटकर यांनी सातारा जिज्ञासा गु्रपचे सदस्य निलेश पंडीत यांना दिली. त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा नंबर काटकर यांना दिला. काटकर यांनी ही हकीकत प्रशांत पोतदार यांना कळवली. लगेच अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दहिवडी गाठले. परंतु देवऋषीच्या दहशतीमुळे मुलीच्या कुटुंबियांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार दिला. आमची कोणतीही तक्रार नसल्याचे मुलीच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. त्यानंतर मुलीचे मामा पोलीस दलात कार्यरत आहेत त्यांच्याशी संपर्क साधून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली व घडलेला सर्व प्रकार जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा असल्याचे सांगितले. कुटुंबातील कोणीतरी याबाबत तक्रार द्यावी अशी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली, मात्र त्यांनी तक्रार देण्याचे नाकारले.

या सर्व प्रकरणाची दखल जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक् यांना दक्षता अधिकारी या तरतुदीनुसार असलेल्या सू मोटो अधिकारातून त्यांनी करावी व मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन्ही देवऋषी यांची तसेच परस्पर मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार्‍या दोषींची सखोल चौकशी करावी अशा मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व सिव्हील सर्जन यांना देण्यात आले आहे. निवदेनावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर, प्रशांत पोतदार, वंदना माने, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांच्या सह्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like