Tuesday, June 6, 2023

धक्कादायक ! मुख्याध्यापकासह चार शिक्षकांनी मिळून 10वीच्या विद्यार्थीनीवर केला सामूहिक बलात्कार

अलवर : वृत्तसंस्था – राजस्थानातील अलवर जिल्ह्यात शिक्षकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने आणि इतर तीन शिक्षकांनी मिळून दहावीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केला आहे. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांनी मिळून हे गैरकृत्य केलं इतकेच नाही तर महिला शिक्षिकेनेही त्यांना साथ दिली अशी तक्रार पीडित विद्यार्थीनेने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

यामध्ये धक्कदायक बाब म्हणजे या प्रकरणात महिला शिक्षिकेने व्हिडीओ शूट केल्याचा आरोपही पीडित विद्यार्थीनीने केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकासह इतर शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये दोन महिला शिक्षिकांचाही समावेश आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ते ट्रक चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी मूकबधिर आहे आणि मुलगी इयत्ता 10 वी मध्ये शिकते अशी माहिती मांढण पोलीस ठाण्याचे अधिकारी मुकेश यादव यांनी दिली आहे.

पीडित मुलीचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना कळाले की आपली मुलगी शाळेत जात नाही. यानंतर त्यांनी आपल्या मुलीला शाळेत न जाम्यामागचे कारण विचारले आणि तिने आपल्या वडिलांना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक गेल्या एक वर्षापासून तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करत आहेत असे पीडितेने आपल्या वडिलांना सांगितले.