धक्कादायक! सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील चेंबूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी सुनेसह तिच्या आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात राहणारे पवन देवदत्त वाघमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

पवन देवदत्त वाघमारे यांनी आपल्या तक्रारीत पत्नीसोबत वारंवार होणाऱ्या कौटुंबिक कलहामुळे आईवडिलांनी त्यांना दुसरीकडे राहण्यास सांगितले. पत्नी पूजाला तेथेच राहायचे असल्याने तिने 3 महिन्यांपूर्वी सासूसासऱ्याविरोधात विनयभंग व मारहाणीची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सासरे देवदत्त वाघमारे यांना अटक केली. तेव्हापासून देवदत्त हे मानसिक तणावाखाली होते. पत्नीला वेळोवेळी सांगूनदेखील ती सासूसासऱ्यासोबत भांडण करत होती. सासूसासरे मेल्याशिवाय घर नावावर होणार नाही म्हणत, पत्नीसह तिचे कुटुंब दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी 15 लाखांची मागणी करू लागले.

या सगळ्या प्रकारामुळे आपले वडील आणखीनच तणावाखाली गेले असल्याचे पवन यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. यानंतर 30 नोव्हेबर रोजी सकाळी 9 च्या सुमारास वडील रिक्षा चालविण्यासाठी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. त्यानंतर आईदेखील कामानिमित्त बाहेर पडली. दुपारी 12 च्या सुमारास जेवणासाठी घरी गेल्यानंतर देवदत्त हे पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले पण त्यागोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा पोलिसांना देवदत्त यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये सुनेसह तिच्या कुटुंबीयाकड़ून 15 लाखांसाठी खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याबरोबर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे लिहिले आहे. या सगळ्याला वैतागून आपण हे पाऊल उचलत असल्याचे लिहिले आहे. यानुसार पोलिसांनी सुनेसह तिचे आईवडील आणि बहीणभावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास सुरु केला आहे.

You might also like