प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळीबार; नांदेड हादरले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नांदेड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शारदा नगर येथील त्यांच्या घराजवळ गोळीबार करण्यात आल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

हाती आलेल्या माहितीनुसार, संजय बियाणी हे आज सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडत असताना अचानक दोन जण दुचाकीवर आले. दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तीने ४ गोळ्या झाडल्या. यात संजय बियाणी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिस दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेणे सुरु आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या गोळीबाराने नांदेड शहर हादरले आहे.