हिंगोली : देशात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. देशातील 9 हजार बेरोजगार तरुणांची फसवणूक करून, नोकरीचे आमिष दाखवत तरुणांना लुटले आहे. हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकातील 11 जणांनी 4 राज्यांतून 11 ते 19 जुन या या 9 दिवसाच्या कालावधीत 7 जणांना अटक केली. संयुक्त पथकाने नांदेड, लखनऊ, दिल्ली, मुंबई, ओडिसा, येथून आरोपीना ताब्यात घेतले. मागील दहा वर्षांपासून फसवणुकीचे हे रॅकेट कार्यरत होते, अशी माहिती नांदेड पोलीसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रसह ओडिसा, आंध्र, प्रदेश, तेलंगना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल या नऊ राज्यासह इतर राज्यांतील हजारो तरुणांची या आरोपीनी कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील पंडित सुधाकर ढवळे या रेल्वेत नोकरी लवण्याचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशातील बोडेपूर येथील संतोष सरोज याने 10 लाख रुपये घेतले. पण पुढे काही दाद मिळत नसल्याने ढवळे यांनी पैसे परत करण्याची मागणी केल्यानंतर त्यांना रेल्वेतील नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र दिले. विशेष म्हणजे नोकरीवर हजर न होताही त्यांना दोन महिन्यांचा पगारही देण्यात आला.
नोकरीवर हजर नसताना पगार मिळत असल्याची शंका ढवळे यांना आल्याने त्यांनी वसमत ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीला गंभीर्याने घेत पोलीसांनी तपास सूरू केल्यानंतर हे एक मोठे रॅकेट असल्याचे त्यांच्या निर्दर्शनास आले. त्यादृष्टीने तपास करताना रवींद्र उर्फ दयानिधी संकुवा (रा. ओडिसा), अँड. नरेंद्र विष्णुदेव प्रसाद (रा. उत्तरप्रदेश) या दोघांना नांदेड रेल्वेस्टेशन परिसरातून अटक केली. रॅकेटमधील उर्वरित आरोपी मुंबई, दिल्ली, लखनऊ आदी ठिकाणी असल्याचे पोलीसांनी सांगितले. या गुन्ह्यात आरोपिनी वापरलेली 18 बँक खाती आणि या खात्यावर असलेले 11 लाख रुपये जप्त करण्यात आले. तसेच मोबाईल, कार जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.