श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मानवतेचे महामंदिर’ ही संकल्पना रुजवित अनेक सामाजिक उपक्रम राबविणारे पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे वयाच्या 65 वर्षी निधन झाले आहे. यकृताच्या कर्करोग या दुर्धर आजारासोबतची त्यांची झुंज अखेर सोमवारी थांबली.

अशोक गोडसे यांच्यावर मागील दोन आठवडयांपासून ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या गोडसे यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी 1 मुलगी, 1 मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गेली 50 ते 55 वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून ते कार्यरत होते. तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेवर संचालक पदी देखील त्यांनी काम केले होते.

सामाजिक क्षेत्रात कायम सक्रिय असलेल्या अशोक गोडसे यांनी अनेक उपक्रम राबविले. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी जय गणेश ज्ञानवर्धन अभियान, रुग्ण सेवा अभियान, संपूर्ण ग्राम अभियान, आपत्ती निवारण अभियान, जलसंवर्धन अभियान, निसर्ग संवर्धन अभियान या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

अशोक गोडसे यांचा जीवनप्रवास

अशोक गोडसे यांनी1968 साली सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रमुख संघटक म्हणून सुरुवात केली. सन 1996 मध्ये ते सुवर्णयुग तरुण मंडळाचे विद्यमान संचालक होते. सन 2001मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची निवड झाली. सन 2010 मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यापासून ते ट्रस्टवर कार्यरत होते.

You might also like