अनैतिक संबंधातून एकट्या राहणार्‍या महिलेचा खून

सांगली : तासगाव तालुक्यातल्या वासुंबे गावच्या हद्दीतील आरफळ कालव्या शेजारी निर्मला तानाजी चव्हाण या महिलेचा मृतदेह आढळला. या घटनेने तालुक्यात एकाच खळबळ उडाली. हा प्रकार खुनाचा असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हा खून अनैतिक संबंधातून घडला असल्याच्या संशयावरून एकाला तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही महिला तासगावातील गणपती मंदिराच्या पाठीमागे भाड्याच्या खोलीत राहते. गेल्या सहा वर्षांपासून ती तिच्या पती पासून विभक्त राहते. तिचे माहेर वासुंबे असून आष्टा येथील पती पासून ती विभक्त असल्याने तासगावात राहते. सोमवारी दुपारी ती राहत्या घरातून बाहेर गेली होती. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह वासुंबे येथे कवठेएकंदला जाणार्‍या आरफळ योजनेच्या कालव्या शेजारी नागरिकांना आढळून आला.

नागरिकांनी याची तातडीने माहिती पोलिसांना दिली असता पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. स्थानिक महिला असल्याने पोलिसांना तिची ओळख पटली. पोलिसांनी प्राथमिक तपासणी केली असता तिचा गळा आवळून खून केल्याचे दिसून आले. तिचा अन्यत्र खून करून मृतदेह या ठिकाणी आणून टाकला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी संशयित म्हणून एकाला ताब्यात घेतले असून तपास आहे.