सातारा | कोरेगाव येथील साखळी पुलाजवळील एका चप्पल विक्रीच्या दुकानाला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने दुकानासह त्यातील मालाचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु आग लागली तेव्हा वीजपुरवठा खंडित झाला होता, असेही काही नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातून जाणाऱ्या सातारा-पुसेगाव मार्गावर साखळी पुलाजवळ पूर्व दिशेला काही टपरीवजा दुकाने आहेत. त्यापैकी बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरवर बाबूलाल ओसवाल यांचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. या दुकानाला दुपारी चारच्या सुमारास अचानक आग लागली. सध्या लॉकडाउनमुळे दुकाने बंद आहेत. या पार्श्वभूमीवर ही आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट झाले नाही.
आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. दरम्यान, नगरपंचायतीकडून पाण्याच्या टॅंकर घटनास्थळी दाखल झाला. जरंडेश्वर शुगर मिलचा अग्निशामक बंबही पाचारण करण्यात आला. मात्र, तोवर आग आटोक्यात आली होती. या आगीमुळे दुकानाचे व त्यातील मालाचे नेमके किती नुकसान झाले, याविषयीची माहिती अद्याप पुढे आली नाही.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा