RSS च्या मोतीबागेत तिरंगा फडकवण्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं – बाबा आढाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : स्वातंत्रदिन देशभर उत्साहात साजरा होत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेला नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही वर्षांपूर्वी RSS च्या मोतिबागेत तिरंगा फडकवला जावा यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं अशी आठवण कष्टकऱ्यांच्या नेते साथी बाबा आढाव यांनी सांगितली. एस.एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन येथे आयोजित ध्वजारोहन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या संविधान कट्टा येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कष्टकऱ्यांच्या नेते साथी डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्या जेष्ठ समाजवादी कार्यकर्त्या साथी राधाताई शिरसेकर होत्या. यावेळी फाऊंडेशनचे विश्वस्त साथी चंद्रकांत निवांगुणे, विश्वस्त आनंद थोरात, सहसचिव उपेंद्र टण्णू, कार्यकारी समिती सदस्य साथी हनुमंत बहिरट, तमन्ना इनामदार, विशाल विमल, व्यवस्थापक राहुल भोसले आदी मान्यवर व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

हर घर तिरंगा मोहिम देशभर उत्साहात साजरी होत आहे. स्वातंत्र्याची पंच्च्याहत्तरी उत्साहात साजरी करायलाच हवी. मात्र त्यासोबत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात कोणाचं योगदान आहे हे पण आपण पाहायला हवे. पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतिबागेतील कार्यालयात तिरंगा फडकवला जावा म्हणुन आम्हाला एकेकाळी आंदोलन करावं लागलं होतं. मात्र तरीही देशाचा राष्ट्रध्वज तेव्हा त्यांनी फडकवला नाही. मात्र आज हेच लोक हर घर तिरंगा असं म्हणत तिरंगा फडकवण्याचं आवाहन करताना दिसत आहेत असं मत बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

देशाचा राष्ट्रध्वज फडकवायला हवाच अन् त्याबाबत मनात आदर असायलाच पाहीजे. मात्र तिरंग्याबाबत कोण सांगत आहे अन् त्यांचे स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान आहे हे सुद्धा आजच्या तरुणाईने तपासून पाहणे गरजेचे आहे. यापूर्वी ध्वाजारोहन न करणार्‍या या लोकांना आजच तिरंग्याची आठवण का झालीय याचा शोध घेणं गरजेचं आहे. राजकिय फायद्यासाठीच आज कोणी देशप्रेमाचा आव आणत असेल तर त्यांना वेळीच ओळखणे गरजेचे आहे असे मत आढाव यांनी बोलताना व्यक्त केले.