औरंगाबाद : राज्य लोकसेवा आयोगाच्या रविवारी 21 मार्च रोजी होणार्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये, यासाठी स्मार्ट सिटी बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख 17 मार्गावर ही बससेवा रविवारी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत यादरम्यान सुरू राहील. शहरातील विविध परीक्षा केंद्रांना लागून या बसेस धावणार आहेत.
मागील आठवड्यातच आठ दिवसापूर्वी झालेल्या राज्य सेवेतील परीक्षेत शहरात कडक लॉकडाऊन असल्यामुळे अनेक परीक्षार्थींची अडचण झाली होती. ही बाब लक्षात घेता शहरात कोणत्याही परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थी रविवारी होणार्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपासून वंचित राहू नये, त्यास परीक्षेला जाताना प्रवासाची अडचण भासू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी शहरातील प्रमुख 17 मार्गांवर परीक्षाथींसाठी ही सिटी बससेवा सुरू राहील. यात नक्षत्रवाडी ते हर्सूल सावंगी, हर्सूल सावंगी ते नक्षत्रवाडी, सिडको बसस्थानक ते विद्यापीठ, सिडको बसस्थानक ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते सिडको, रेल्वेस्टेशन ते रेल्वेस्टेशन रिंग रूट, सिडको ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते सिडको, सिडको ते औरंगपुरा, हर्सूल टी पॉइंट ते रेल्वेस्टेशन या मार्गांचा समावेश आहे. सिटी बसेसचे हे नियोजन शहरातील विविध परीक्षा केद्रांना लागून जाईल, असे ठरवण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा