कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील येणके येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत 3 ते 4 फूट लांबीची घोणस पडल्याची घटना शनिवारी घडली. या घोनसीला जीवदान देण्यात सर्पमित्रांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येणके येथील शेतकरी रामचंद्र ज्ञानू गरुड यांच्या विहिरीत शनिवारी रसल वायपर घोणस पडली होती. रामचंद्र गरुड हे शेतातील विहिरीजवळ गेले असता त्यांना ती दिसून आली. त्यांनी याबाबतची माहिती सर्पमित्र रोहित कुलकर्णी, अजय महाडिक, गणेश काळे, मयूर लोहार, अमर भोपते यांना दिली. घोणसीबाबत माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर त्यांनी दोरी व इतर साहित्याच्या साहाय्याने विहिरीत पडलेल्या रसल वायपर घोणसेला सुरक्षितपणे बाहेर काढले. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित सर्पमित्रांनी घोणस सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढल्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.