रोम जळत असताना फिडल वाजवणाऱ्या निरोचे दरबारी, असे आपल्याबाबत कोणी म्हणणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लढा कोरोनाशी । अजित कुलकर्णी

कोरोना नावाचा महाभयंकर विषाणू मानवावर हल्ला करेल, कधीही कोणासाठी न थांबणारे जग जगण्यासाठी अनिश्चित काळासाठी थांबेल, असे कोणास काही महिन्यांपूर्वी सांगितले असते तर त्याने सांगणाऱ्याला मूढ ठरवले असते. कोरोना आपत्तीचा अंदाज कोणालाही आला नाही व जगातील सर्व महान शक्ती या कोरोना संकटापुढे निष्प्रभ झाल्या. धावणारे जग पूर्ववत कधी होईल..? याचे फक्त अंदाजच लावता येत आहेत. सुखवस्तू , मध्यम वर्ग हा जगाच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंता करतोय. सेलिब्रिटी लोक सोशल मीडिया मधून आपल्या मोठ्या मोठ्या घरात बसून या वेळेचा काय सदुपयोग करतो आहोत ते सांगत आहेत. मात्र हातावर पोट असणारे लोक हे सगळं कधी संपणार आणि आपल्याला कामं कशी मिळणार याबाबत चिंता करत आहेत. एकदम समोर येऊन पडलेली ही आपत्ती खऱ्या जगाचे व धैर्याचे दर्शन प्रत्येकाला देत आहे. मानवी मूल्यांचे अवमूल्यन, निसर्गाचे व पर्यावरणाचे झालेले नुकसान, ओस पडलेली खेडी, बकाल शहरे याचा विचार आता सगळ्यांच्या मनात घोंगावत आहे. विकास नावाची संकल्पना पूर्णपणे आगामी काळात बदलेल अशी एकमेव आशा या काळात वाटायला लागली आहे.

बंदने दिली आतल्या आवाजाला हाक
कोरोना मुळे संपूर्ण देश व महाराष्ट्र राज्य पूर्णपणे बंद ची घोषणा झाली. कोरोना आजाराचा प्रसार कसा होतो हे माध्यमातून समजायला लागले. आपण सर्वांनी आहे तिथेच थांबायचे असून आपले घर सोडायचे नाही हा आदेश सरकारने दिला. जणू घराच्या बाहेर आलो की आपले जीवन संकटात येणार अशी स्थिती झाली. हे सगळे मन खूप सुन्न करणारे आहे. मृतांचा व बाधितांचा वाढता आकडा छातीची धडधड वाढवणारा होता. आशा स्थितीत आपला जीव राहिला तर जगाचे आपण पाहू शकू असा विचार समोर आला. साहजिकच हा विचार नैसर्गिक होता. आम्ही स्नेहालय-अनामप्रेम परिवारातील सर्व कार्यकर्ते तर एकदमच काही क्षण थंड झालो. सतत काहीतरी रचनात्मक कामातून व्यक्त होण्याची लागलेली सवय, एका ठराविक चौकटी शिवाय धावते काम करण्याची लकब, एक परिवार-कुटुंब म्हणून सोबत असणारे शेकडो लाभार्थी यांची सतत सोय लावणे. हे सगळे एकदम सोडून आपला स्वतःचा जीव सांभाळणे गरजेचे आहे ही भावना एकदम अस्वस्थता आणणारी, मरणासारख्या किंवा त्याच्या आसपासच्या वेदना देणारी ठरली. अशा अवस्थेत सर्वांचे आधारस्तंभ, प्रेरणा डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी एक विचार सर्वांना पाठवला. बंदच्या काळात गरजू व शहरात अडकलेल्या मजुरांना मदतीचा हात देण्याचे अभियान यातून सुरू झाले.

जगण्यासाठी खिचडीचा पहिला पर्याय
बंद च्या पहिल्या दिवशी सर्वांच्या मनावर दडपण होते. माणसाजवळ जाणे निषिद्ध झाले असण्याच्या वातावरणात अहमदनगरच्या संजय नगर झोपडपट्टीमध्ये हातावर पोट असणारे, वृद्ध लोक, दिव्यांग व कुष्ठ रुग्ण यांना पोटाची खळगी भागवण्यासाठी दोन वेळची तांदूळ खिचडी पाठवण्यापासून या मदत अभियानाला सुरुवात झाली. तयार अन्न घेऊन जाणे, कधी कधी अन्न कमी पडणे, काही लोक बाकी राहणे असे समोर आल्याने कोरडा शिधा देण्याचे सर्वांनी दुसऱ्या दिवशी ठरवले. स्नेहालय परिवारातील काही दात्यांनी लागोलाग यासाठी ऑनलाईन मदतीचा हात दिला. त्यानंतर किमान झोपडपट्टीत राहणाऱ्या १००० कुटुंबांना आठ-दहा दिवस पुरेल एवढा किराणा एका गोणीत भरून वाटण्याचे ठरले. याला मागील १२ दिवसात मिळून या कुटुंबांना तसेच देहव्यापारातील महिला-मुली, दिव्यांग, तृतीयपंथी, आजारी निराधार वृद्ध यांच्यापर्यंत हे किराणा किट आम्ही पोहचवत आहोत.

अत्यंत कमी जागेतील झोपड्यातील वस्ती, सात ते आठ लोकांपेक्षा जास्त संख्येचे कुटुंब, जास्तीत जास्त किराणा किंवा अन्न घरात न्यायाची प्रत्येकाची धडपड, पदर-टॉवेल-ओढणी- कापडी चिरगुठ अशाने नाक -तोंड बांधलेली माणसे, मधूनच पडणारा अवकाळी पाऊस, भीतीदायक कानावर येणाऱ्या जगण्या मरणाच्या बातम्या, हटकणारे पोलीस, रस्त्यावरून डोकी – पाठी बिराड घेऊन शेकडो मैल चालून शिणलेले जीव असे कामगार पाहून आम्ही निशब्द झालो. गरजुंना मदत देताना नियमित काही सूचना द्याव्या लागतात. कितीही वेळा गर्दी करू नका म्हणले, रिंगण ओढले असले तरी शिस्त न पाळू शकणारी भूक आम्ही या किराणा व अन्न वाटप अभियानात पाहायला मिळाली. स्नेहालय-अनामप्रेम परिवारातील सर्वांचे हात या अभियानात राबत आहेत. बंद खोल्यात काही कार्यकर्ते वाण सामान पिशव्यांत भरायचे काम करत आहेत, ठराविक जण स्वतःची काळजी घेत सरकारी नियमाचे पालन करून बाहेर वस्त्यावस्त्यात जाऊन साहित्य वाटप करीत आहेत. यादरम्यान भाजीपाला व कडधान्ये यांची कमी लक्षात घेता याचेही वाटप करण्याचे ठरवले. रोज ३०० पेक्षा जास्त पाकिटे भाजीपाला व कडधान्ये पोहचवत आहोत. पोलीस, प्रशासन यांच्या सूचना लक्षात ठेऊन वाटप कार्यक्रम, मदत संकलन कार्यक्रम आखणे असा आमचा सध्याचा दिनक्रम झाला आहे.

खेड्याची अवस्था आणि वाट बिकटच
कोरोनाने शहर व खेडे यातील रेष गडद केलीय. मोठे शहर आणि परदेशात नोकरी-व्यवसाय-शिक्षण करणे जीवावर बेततेय की काय.? असा प्रश्न समोर आला आहे. भविष्यात ग्रामीण जीवन व शेती आधारित व्यवसाय हे जगण्याचे शाश्वत मार्ग आहेत असे नक्की वाटायला लागले आहे. तालुक्यातील आसपासच्या खेड्यातील प्रवेश करणारे रस्ते गावकऱ्यांनी खोदले आहेत. कोणीही बाहेरचा व्यक्ती गावात येणार नाही. गावातील बाहेर जाणार नाही अशी काळजी घेतली जात आहे. शहरातून गावाकडे आलेला व्यक्ती घरातून बाहेर निघणार नाही याची काळजीही सर्वत्र घेतली जातेय. सर्व वेदना अंगावर काढून औषध न घेणारी खेडूत माणसे दवाखान्यात जायची वेळ येतेय की काय या कल्पनेने घाबरली आहेत. खेड्यातील शेती व त्या आधारित उद्योग ही ग्राम व्यवस्था पूर्वीसारखी स्वयंपूर्ण नाही. त्यामुळे लॉकदाऊन वाढल्यास खेड्यांची अवस्थाही अवघड होणार आहे. काही काळात ही स्थिती निवळेल पण खेड्यांचा शाश्वत विकास, झोपड्यांचा विकास, आरोग्य व स्वच्छता यावर येणाऱ्या काळात काम केले पाहिजे असे तीव्रतेने हे संकट सांगत आहे. वातावरण नक्कीच निराशाजनक आहे यातून सकारात्मक काही तरी नक्की होईल अशी आशा आहेच.

कोरोना आपत्तीत शक्य ती मदत इतरांना करणे म्हणजे निरपराधी समजणे
शालेय जीवनात आपण एक कथा ऐकली आहे. वनाला लागलेली आग चोचीत पाणी घेऊन विझवणाऱ्या चिमणीची गोष्ट आपण ऐकली आहे. ती चिमणी व्हायची संधी आपणाला आलेली आहे. स्वतःच्या घरात नियमाने स्थानबद्ध होणे, वेळोवेळी शासनाने सांगितलेले सर्व नियम पाळणे, जे गट-संस्था- शासन-निवारा केंद्रे सहाय्य करीत आहेत तिकडे आर्थिक किंवा शक्य ती नियमात राहून मदत करणे म्हणजे या काळात ती आग विझवणारी चिमणी होणे आहे. इतिहासात त्या चिमणीची नोंद कुठेय माहीत नाही पण आपली नोंद इतिहासात नक्की असणार आहे. कारण आपण ही कोरोना आपत्तीतून गेलो आहोत. आज पोलीस, आरोग्य विभाग, स्वच्छता कामगार, बँकेचे कर्मचारी हे सैनिक झालेले आहेत. आम्ही देखील आणि आमच्यासारख्या अनेक संस्था, संघटना, कार्यकर्ते शक्य ती मदत गरजुंपर्यंत राज्यात पोहचवत आहेत. अनेक दाते यानिमित्ताने पुढे आले आहेत.

अजित कुलकर्णी
अनामप्रेम, स्नेहालय भवन मागे, अहमदनगर
9011020174
[email protected]

Leave a Comment