सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी लागणार ; केंद्र सरकारने जाहीर केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोशल मीडियाचा गैरवापर केल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या आहेत. ट्वीटर, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला जात असल्याच्या देखील अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. अशी अनेक प्रकरणे न्यायालयापर्यंत देखील गेली आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने यासंदर्भातली नवीन नियमावली जारी केली आहे. यासंदर्भात पत्रकार परीषद घेऊन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली आहे.

रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, सोशल मीडियाला भारतात व्यवसाय करण्याची पूर्ण मुभा आहे. त्यांचं स्वागत आहे. सोशल मीडियाच्या युजर्सच्या तक्रारी निवारण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. नियमांचं उल्लंघन करून सोशल मीडियावर गोष्टी व्हायरल केल्या जात आहेत. व्यवसाय करण्यासाठी सोशल मीडियाचं भारतात स्वागत आहे. पण सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्लॅटफॉर्म असावा. द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.

काय आहे केंद्र सरकारची नियमावली –

तक्रार निवारण व्यासपीठ आणि अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. तो तक्रार २४ तासांत नोंद करून घेईल आणि १५ दिवसांत तिचं निवारण करेल

पोस्ट शेअर करणाऱ्याची सगळी माहिती असली पाहिजे

नवीन सोशल मीडिया नियम तीन महिन्यांत लागू केले जातील

जर युजर्सच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारा मजकूर असेल, विशेषत: महिलांच्या, उदा. आक्षेपार्ह छायाचित्रे, असा मजकूर तक्रार दाखल झाल्यापासून २४ तासांत तो काढून टाकावा लागेल

आक्षेपार्ह मजकूर सर्वात आधी कुणी सोशल मीडियावर टाकला ते सांगावं लागेल. जर तो मजकूर भारताबाहेरून आला असेल, तर तो भारतात पहिल्यांदा कुणी टाकला, हे सांगावं लागणार

जर कुठल्या युजरचा डेटा किंवा ट्वीट किंवा मजकूर हटवला गेला, तर तुम्हाला युजरला सांगावं लागेल आणि त्याची सुनावणी करावी लागेल

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like